लास वेगास; वृत्तसंस्था : भारताच्या 21 वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने, जागतिक बुद्धिबळात नवा इतिहास रचला आहे. लास वेगास येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या फ्रीस्टाईल चेस ग्रँड स्लॅम टूरच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोमहर्षक उपांत्यपूर्व सामन्यात त्याने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोवचा 1.5 - 0.5 असा सहज पराभव करत अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. अर्जुनचा आता उपांत्य फेरीत अनुभवी ग्रँडमास्टर लेवॉन अरोनियनविरुद्ध सामना होणार आहे.
अर्जुनने या महत्त्वपूर्ण लढतीत आपला आक्रमक आणि कल्पक खेळ दाखवला. त्याने पहिला रॅपिड सामना जिंकून निर्णायक आघाडी घेतली आणि दुसरा सामना बरोबरीत सोडवत विजय साकारला.
चेस 960 (फ्री स्टाईल) या नावाने ओळखल्या जाणार्या या प्रकारात पारंपरिक चालींपेक्षा खेळाडूंच्या सर्जनशीलतेला अधिक महत्त्व दिले जाते आणि याच शैलीत अर्जुनने आपली छाप पाडली आहे. यापूर्वी साखळी फेरीतही त्याने 7 पैकी 4 गुणांची कमाई करत दिग्गज खेळाडूंमध्ये आपली क्षमता सिद्ध केली होती. फॅबियानो कारुआना आणि हॅन्स नीमन हे इतर दिग्गज खेळाडूही या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.