पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याचा एक मुझ्यिक कॉन्सर्ट 'दिल-लुमिनाटी' (Dil-Luminati concert) टूरवरून चर्चेत आला आहे. हल्लीच त्याने दिल्ली आणि जयपूरमध्ये शो केले होते. येथे त्याच्या कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली. दरम्यान, आज १५ नोव्हेंबर रोजी त्याचा कॉन्सर्ट होणार आहे. पण त्यापूर्वी दिलजीत दोसांझ वादात सापडला आहे. कारण तेलंगणा सरकारने (Telangana government) दिलजीत दोसांझ आणि आज हैदराबादमध्ये होणाऱ्या त्याच्या 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्टच्या आयोजकांना नोटीस बजावली आहे. कॉन्सर्टमध्ये दारू, ड्रग्ज अथवा हिंसाचाराला प्रमोट करणारे कोणतेही गाणे गाऊ नये, असे नोटीसमधून सांगण्यात आले आहे.
हे निर्देश चंदीगडचे प्राध्यापक पंडितराव धरनेवार यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आहेत. त्यांनी दोसांझ याला लाईव्ह शोमध्ये अशी गाणी गाण्यापासून रोखण्यासाठी तक्रार केली होती. दोसांझने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि जयपूरमध्ये हल्लीच झालेल्या 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्टसह मागील काही शोमध्ये दारू, ड्रग्ज अथवा हिंसाचाराला प्रमोट करणारी गाणी गायिली होती. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओ सादर केला होता. इतर आंतरराष्ट्रीय शोमध्येही त्याने अशी गाणी सादर केली आहेत.
दोसांझच्या चाहत्यांना हैदराबादमधील कॉन्सर्टची प्रतीक्षा आहे. त्याच्या या शोची जवळजवळ सर्व तिकिटे विकली गेली आहेत. ११ शहरांची टूर असणाऱ्या दिलजीत दोसांझच्या दिल-लुमिनाटी कॉन्सर्टची सुरुवात २६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत झाली होती. दिल-लुमिनाटी टूरमधील हैदराबाद येथील त्यांचा कॉन्सर्ट हा तिसरा शो आहे.
दरम्यान, दोसांझला जारी केलेली नोटीस त्याच्या चाहत्यांचा उत्साह कमी करू शकते. धरेनवार यांनी सादर केलेल्या निवेदनानंतर रंगा रेड्डी जिल्ह्यातील महिला आणि बालकल्याण आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाने ही नोटीस जारी केली आहे. या नोटिशीत स्पष्टपणे असे म्हटले आहे की कार्यक्रमाचे आयोजक आणि गायक यांनी लाईव्ह शो दरम्यान स्टेजवर मुलांना सहभागी करून घेऊ नये. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) साऊंड एक्सपोजरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्टेजवर मुलांच्या सहभागास या नोटिसांमधून मनाई करण्यात आली आहे.