सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अमेरिकन सिंगर आणि सॉन्गरायटर टेलर स्विफ्ट सध्या आपल्या संगीत करिअरमधील एका ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेत आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द लाईफ ऑफ अ शोगर्ल’ या 12 व्या स्टुडिओ अल्बमने पहिल्याच आठवड्यात विक्रमी विक्री करत संगीत विश्वात नवा इतिहास रचला आहे.
या अल्बमने अवघ्या एका आठवड्यात 4.002 दशलक्ष (मिलियन) कॉपीज विक्रीचा टप्पा पार करत आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला आहे. याआधी अॅडेलच्या ‘25’ या अल्बमने 2015 मध्ये एक आठवड्यात 3.378 दशलक्ष कॉपीज विकून विक्रमी कामगिरी केली होती. मात्र, टेलरच्या या नव्या अल्बमने तो विक्रम मागे टाकत नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. यामुळे टेलर स्विफ्टने बिलबोर्ड 200 चार्टवर एकूण पंधरा नंबर 1 अल्बम मिळवले आहेत. यामुळे तिने रॅपर ड्रेक आणि जे-झेड यांना मागे टाकले असून, ती ही कामगिरी करणारी एकमेव कलाकार ठरली आहे. या आधी ड्रेक आणि जे-झेड यांच्याकडे प्रत्येकी चौदा नंबर 1 अल्बम्स होते. सध्या टेलर स्विफ्ट केवळ द बीटल्स यांच्या मागे आहेत, ज्यांचे एकूण 19 अल्बम्स बिलबोर्ड चार्टवर नंबर 1 वर राहिले आहेत.
टेलरने तिच्याच मागील अल्बम ‘द टॉर्चर पोएटस् डिपार्टमेंट’ चा विक्रमदेखील मोडला आहे. त्या अल्बमच्या एक आठवड्यात 8,59,000 कॉपीज विकल्या गेल्या होत्या. मात्र, नवीन अल्बमने त्यापेक्षा पाच पटींनी अधिक विक्री केली आहे. टेलर स्विफ्टच्या गाण्यांना जगभरातील चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. तिचे ‘यू बिलॉन्ग विथ मी’, ‘लव स्टोरी’, ‘ब्लँक स्पेस’ आणि ‘इट इज ओव्हर नाऊ’ यांसारखी गाणी सुपरहिट ठरली. तिने आपला संगीत प्रवास 2006 मध्ये ‘टेलर स्विफ्ट’ या पहिल्या अल्बमपासून सुरू केला होता. त्यानंतर 2008 मध्ये फीयरलेस, 2009 मध्ये स्पीक नाऊ, 2012 मध्ये रेड, 2014 मध्ये 1989, 2017 मध्ये रेप्युटेशन अशा एकापेक्षा एक सुपरहिट अल्बम्स तिने दिले आहेत. वैयक्तिक आयुष्यामुळेही ती चर्चेत राहिली. अलीकडेच ती अमेरिकन फुटबॉलपटू ट्रेव्हिस केल्से सोबतच्या साखरपुड्यामुळे प्रकाशझोतात होती.