पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जमशेदपूर, झारखंड येथून अटक केली आहे. संशयिताची प्राथमिक ओळख ही भाजीविक्रेता अशी दिलेली आहे. त्याचा नावाचा खुलासा अद्याप केलेला नाही. संशयिताने बॉलीवूडच्या दबंग खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावून 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला धमकी मिळाली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला झेड प्लस संरक्षण देखील दिले आहे. यानंतर मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून आले. आता त्यांनी केलेल्या कारवाईत जमशेदपूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करण्यात आला असून धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, “जमशेदपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करण्यात आला आणि धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. आरोपींना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Salman Khan)
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानला 18 ऑक्टोबर रोजी पुन्हा धमकी मिळाली होती. मुंबई पोलिसांना मिळालेल्या संदेशात धमकीला हलके घेऊ नका अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षाही वाईट होईल, असे म्हटले होते. लॉरेन्स बिश्नोईशी असलेले दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.