Daya Dongre | ज्येष्ठ सिनेअभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन 
मनोरंजन

Daya Dongre | ज्येष्ठ सिनेअभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमधील खाष्ट सासू, कधी खलनायिका, तर कधी करारी तर कधी हळवी अशा स्त्री जीवनाच्या विविध छटांद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार उपस्थित होते.

दया डोंगरेंचा यांचा जन्म 11 मे 1940 रोजी अमरावतीत त्यांच्या आजोळी झाला. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे त्यांचे काही काळ कोल्हापूर आणि धारवाडमध्ये वास्तव्य होते. त्यांची आत्या व आई या दोघी हौशी रंगभूमीच्या कलाकार. त्यामुळे आपसूकच त्यांची पावले रंगभूमीकडे वळली. मात्र त्याआधी त्यांनी नागेश बुवा खळीकर यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. ऑल इंडिया रेडिओच्या सुगम संगीत स्पर्धेतील यशाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘आत्मविश्वास’ चित्रपटात त्यांनी साकारलेली वासंती सरपोतदार या छोटेखानी भूमिकेतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. तब्येतीच्या कारणामुळे 90 च्या दशकात त्यांनी मालिका आणि चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. छोटा आणि मोठा पडदा गाजविणार्‍या या अभिनेत्रीच्या वाट्याला फारसे पुरस्कार आले नाहीत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 2019 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

नवरी मिळे नवर्‍याला, चार दिवस सासूचे, खट्याळ सासू नाठाळ सून बिर्‍हाड वाजलं, चंपा गोवेकर, लेकुरे उदंड झाली, संकेत मीलनाचा, ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकातील हळवी, मुलासाठी आसुसलेली राणी, तर ‘संकेत मीलनाचा’ या नाटकातील परखड नायिका अशा दोन परस्परविरोधी भूमिका दया डोंगरे यांनी त्यांच्या अभिनयाने जिवंत केल्या.

दया डोंगरे...अत्यंत देखणी...नाक धारदार...जिवणी पातळ...नजर करकरीत...तिचं लेकुरे बघितलेलं होतं. आत्मविश्वासच्या वेळी प्रत्यक्ष भेटले होते. नेमकेच सीन्स... तरी...चित्रपटाचा गाभा होता त्यातला प्रत्येक सीन ...तिच्या भूमिकेचं महत्व ते होतं...मला तेव्हाही तिचं सहजपण भावलेलं...आजही ... आत्ताही...तेच जाणवतंय...
नीलकांती पाटेकर, अभिनेत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT