प्रचंड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये प्रत्येक सेकंदाला असंख्य बालके जन्म घेत असतात. लोकसंख्य वाढवण्यात आपली कर्तबगारी मोठी आहे. मोठ्या शहरांमध्ये तर एकाच दिवसामध्ये 50 ते 100 बालकांचा जन्म होत असतो. उदयपूरच्या एका रुग्णालयात नवजात बालकांच्या अदलाबदलीचा वाद सध्या गाजत आहे. म्हणजे झाले असे की मीरा नगरच्या अनिता रावत यांच्याकडे मुलगी तर चितोडगडच्या रहिवासी असलेल्या रामेश्वरी यांना मुलगा झाला आणि काही वेळातच या बालकांची अदलाबदली झाली. कोणते मूल कुणाचे यावरून बराच राडा झाला.
रुग्णालयातील कर्मचार्यांनी ऑपरेशन थिएटर बाहेर येऊन दोन्ही महिलांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देण्यामुळे सगळा गोंधळ झाला होता. मुलीच्या जन्माची माहिती चुकून मुलाच्या कुटुंबीयांना देण्यात आली तर मुलाच्या जन्माची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली गेली. दोन्ही कुटुंबे ऐकण्यास तयार नव्हती. आम्हाला मुलगाच झाल्याचा दोन्ही कुटुंबीयांनी आग्रह धरला. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले तेव्हा कुठे परिस्थिती नियंत्रणात आली.
काही गोंधळ झाला की तंत्रज्ञान आता मदतीला आले आहे. या दोन्ही बालकांचे पालक नेमके कोण आहेत याची शहानिशा करण्यासाठी डॉक्टरांनी डीएनए टेस्ट करण्याची पण तयारी केली होती. डीएनए टेस्ट रिपोर्टसाठी 15 दिवस लागत होते म्हणून त्या काळात ही दोन्हीही बालके सांभाळण्याची तयारी दवाखान्याच्या प्रशासनाने दाखवली होती. सगळे रिपोर्ट आणि सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतर दोन्ही बालकांच्या पालकांचे समाधान झाले आणि ज्याचे त्याला बाळ सुपूर्द करण्यात आले. एखाद्या कॉमेडी चित्रपटात शोभला असता असा हा सीन.
मंडळी या तुलनेत प्राण्यांचे फार चांगले असते. 100 गायी असतील आणि 40 वासरे असतील तर नुकतेच जन्मलेले वासरू सुद्धा न चुकता आपल्या आईजवळच दूध प्यायला जाते. सगळी वासरं एकसारखी दिसत असूनही आपापल्या आईला मतलब गायीला बरोबर ओळखतात. चुकून एखादे वासरू दुसर्या गायीला दूध प्यायला लागले तर ती चूक त्या गायीच्या लक्षात येते आणि ती हलकेच त्या वासराला लडिवाळपणे झटका देते आणि सांगते की मी तुझी आई नाही. गडबडलेले ते वासरू तत्काळ आपल्या आईचा शोध घेते आणि आईला प्यायला सुरू करते. कुठलीही जन्मखून, मार्क नसताना नवजात वासरू सुद्धा आपल्या आईला ओळखते आणि आई पण आपल्या वासराला ओळखते. ही गंमत माणसांमध्ये मात्र हरवून गेली आहे. माणसांमध्ये आपले बाळ कोणते आहे हे शोधण्यासाठी गोंधळाच्या परिस्थितीमध्ये थेट डीएनए टेस्ट करावी लागते आणि तेव्हा कुठे कोणते मूल कुणाचे याचा फैसला होत असतो. माणसांमध्येही प्राण्यांचे काही चांगले गुण यायला हवेत. कारण, एकंदरीत पाहता माणसांचे अवघड जगणे होत चालले आहे.