उमेश कुमार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप दोघेही तरुणांच्या मनात विचारांची बीजे पेरण्याच्या कामात गुंतले आहेत. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या संघाच्या तीन दिवसीय प्रांत प्रचारक बैठकीने याचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. या बैठकीत सामाजिक कार्य आणि संघटना विस्तारावर गंभीर विचारविनिमय झाला. संघाने पुढील एका वर्षाची रणनीती तयार केली आहे. संघाला आता गाव, तालुका आणि प्रखंड स्तरावर पकड मजबूत करायची आहे. संघाच्या शताब्दी वर्षात हे काम प्रत्यक्षात आणले जाईल.
संघाचे लक्ष भारताची सर्वात मोठी ताकद असलेल्या तरुणांवर आहे. ज्या देशात निम्मी लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, तिथे विचारधारेची बीजे रोवण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे. ही गोष्ट संघ चांगल्या प्रकारे जाणतो. आता संघ जुन्या कार्यपद्धतीऐवजी डिजिटल आणि तांत्रिक साधनांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचू इच्छितो. तीन दिवसांच्या या बैठकीत याच विषयावर दीर्घ चर्चा झाली आणि संघटना विस्तारासाठी नवे मापदंड निश्चित करण्यात आले. संघाची कार्यशैली त्यांना इतर संघटनांपेक्षा वेगळे ठरवते. प्रांत प्रचारकांच्या बैठकीत संघ केवळ सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करतो. ही संघटना आपल्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीतच राजकीय मुद्द्यांवर चर्चा करते. त्यामुळे तीन दिवसीय प्रांत प्रचारक बैठकीत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता नाही.
संघाच्या या बैठकीत भाजपसाठीही अप्रत्यक्षपणे अनेक संदेश दडलेले होते. यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. युद्धासारख्या आपत्कालीन परिस्थितीत समाजाची भूमिका कशी होती, कुठे चुका झाल्या, भविष्यात काय सुधारणा आवश्यक आहेत, यावर गंभीर मंथन झाले. या बैठकीत थेट राजकारणावर चर्चा होत नसली, तरी सामाजिक विषयच राजकारणाची जमीन तयार करतात. भाजपला हे स्पष्टपणे समजून घ्यावे लागेल की, संघाच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आगामी काळात भाजपला आपली राजकीय दिशा याच संदेशांनुसार ठरवावी लागेल. भाजपसाठी ही वेळ संघटना आणि नेतृत्व या दोन्हींना नव्याने परिभाषित करण्याची आहे. नुकतेच अनेक राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेशात नियुक्त झालेले नवीन चेहरे हेच सिद्ध करतात की, संघ संघटनेवर आपली पकड मजबूत करत आहे. आता उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकसारख्या मोठ्या राज्यांमध्ये नवीन अध्यक्ष निवडले जाणार आहेत. त्यानंतर पक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदावर अंतिम निर्णय घेईल.
गेल्या एका दशकात भाजपने विचारधारा, संघटना आणि निवडणूक व्यवस्थापन यांचा असा समतोल साधला की, ते केंद्राच्या सत्तेवर सातत्याने टिकून राहिले. 2014 ते 2024 पर्यंत पक्षाने सत्ता कायम ठेवली. आता त्यांचे लक्ष 2029 च्या निवडणुकीवर आहे; पण हा मार्ग तितका सोपा नाही. अलीकडच्या काळात पक्षातील काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आला. सर्वात चर्चित वक्तव्य भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे होते, ज्यात ते म्हणाले होते की, आता पक्षाला कोणाचीही गरज नाही. ही गोष्ट संघाला खटकली. परिणामी, निवडणुकीदरम्यान संघाने आपला हात आखडता घेतला आणि भाजपला नुकसानही सोसावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संघाची नाराजी दूर करण्यासाठी नागपूरपर्यंत धाव घ्यावी लागली. संघाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने प्रांत प्रचारक बैठकीत स्पष्ट केले की, भाजप हा संघाचाच एक भाग आहे. संघ 100 वर्षे जुना आहे, भाजप तर केवळ 1980 मध्ये स्थापन झाला. संघाने हेही स्पष्ट केले की, ते केवळ भाजपलाच नाही, तर काँग्रेसलाही संदेश देत राहतील. त्यांचे काम राजकारण करणे नाही; पण राजकारणाला दिशा देण्यात ते कधीही मागे हटणार नाहीत.
भाजप घटनांवर प्रतिक्रिया देत नाही, तर घटना घडवतो. आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्यावर तिला पुन्हा चर्चेत आणणे असो किंवा जातीय समीकरणांना शह देण्यासाठी सामाजिक सलोख्याची भाषा करणे असो, ही सर्व संघाची बौद्धिक उपज आहे, ज्यावर भाजप आपली रणनीती आखतो. भाजपचे राजकारण केवळ आकड्यांवर चालत नाही. त्याचे खरे शस्त्र संघटना, संदेश आणि नेतृत्वाची विश्वासार्हता आहे. हे तीन स्तंभच त्यांना प्रत्येक निवडणुकीत इतर पक्षांपेक्षा पुढे ठेवतात. आता भाजपसमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपत आहे. ऑगस्टपर्यंत नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, कैलाश विजयवर्गीय, शिवराज सिंह चौहान अशी अनेक नावे चर्चेत आहेत; पण अंतिम निर्णय संघ आणि भाजपच्या संयुक्त मंथनातूनच होईल.
आणखी एक मोठा प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्या उत्तराधिकार्याबाबत आहे. मोदी यावर्षी 75 वर्षांचे होणार आहेत. पक्षात अशी एक परंपरा आहे की, 75 वर्षांनंतर नेते सक्रिय सरकारी जबाबदारीतून मुक्त होतात. अडवाणी आणि जोशी यांची उदाहरणे सर्वांसमोर आहेत. प्रश्न असा आहे की, मोदी ही परंपरा मोडतील की, 2029 पूर्वी काही संकेत देतील? भाजपची रणनीती दीर्घकालीन असते. पक्ष प्रत्येक निवडणुकीनंतर नवीन सामाजिक समीकरणे शोधतो. तरुण, महिला, ओबीसी, शहरी वर्ग या सर्वांना लक्षात घेऊन संघटना तयार केली जाते. यामुळेच तो एकामागून एक निवडणुका जिंकण्यात यशस्वी झाला आहे. मोदी यांनी भाजपला केवळ सत्तेतच ठेवले नाही, तर पक्षाला एका स्थायी गव्हर्नन्स मॉडेलमध्ये रूपांतरित केले आहे. आता 2029 साठी पंतप्रधानपदाचा नवीन चेहरा शोधावा लागेल किंवा विद्यमान पंतप्रधानांच्या चेहर्यावरच पुढे जावे लागेल. भाजप आणि संघ यांच्यात यावर मंथन होणे बाकी आहे; मात्र या पदाच्या शर्यतीत आतापासूनच अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये अमित शहा, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील एक मोठे नेते म्हणून गडकरी हे संघ आणि संघटना या दोघांमध्ये दुव्याचे काम करू शकतात. भाजपचे राजकारण संघाशिवाय अपूर्ण आहे. संघाला माहीत आहे की, सत्ता केवळ खुर्चीवर चालत नाही. त्यासाठी जमिनीवर कार्यकर्ते, विचारधारा आणि शिस्त हवी असते. बिहारसारख्या राज्यांमध्ये भाजप आघाडीसोबत सरकार चालवत आहे; पण समांतरपणे संघटनाही मजबूत करत आहे. भाजप 2029 साठी केवळ निवडणुकीची तयारी करत नाही, तर उत्तराधिकार्याच्या सर्वात मोठ्या परीक्षेची तयारी करत आहे.