सध्या संपूर्ण राज्यात काही प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. यात पहिला क्रमांक आहे ते म्हणजे बिबटे यांचा. बिबट्यांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या बातम्या येत आहेत. या बिबट्यांना कसे आवरायचे याचा विचार तत्काळ करणे आवश्यक झाले आहे. बिबटेप्रवण क्षेत्रामध्ये बिबटे संध्याकाळच्या वेळी सक्रिय होतात आणि अंगणात खेळणारी मुले किंवा राखणीसाठी असलेले कुत्रे यांना उचलून घेऊन जातात. शिरूर तालुक्यामध्ये बारा वर्षांच्या मुलाला बिबट्याने फरफटत नेऊन मारले, या गोष्टीमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झालेला आहे. वाघांची संख्या मर्यादित आहे; परंतु बिबट्यांची संख्या अमर्याद होत आहे. या दोन प्राण्यांमध्ये बिबट्या अत्यंत घातक प्राणी आहे. कारण, तो मांजरीच्या पावलांनी आक्रमण करतो आणि बरेचदा कारण नसताना आक्रमण करतो. वाघाचे तसे नसते. तो शिकार कोणती आहे, हे आधी ठरवतो आणि मगच आक्रमण करतो. सातत्याने होणारे बिबट्यांचे हल्ले पाहून या बिबट्यांना आवरा रे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दुसरा उपद्रव करणारा प्राणी म्हणजे भटके कुत्रे. भटक्या कुत्र्यांनी माणसावर हल्ला केला नाही, असा दिवस जात नाही. या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न बर्याच ठिकाणी केला जात आहे; परंतु त्यामुळे यांची संख्या कमी होईल, अशी शक्यता कमी वाटते आहे. एक तर हे भटके कुत्रे सदा सर्वदा खाण्यासाठी भुकेले असतात आणि त्यामुळे चिडचिडे झालेले असतात. एखादा लहान मुलगा किंवा मुलगी त्यांच्या तावडीत सापडली तर ते हिंसक हल्ला करतात आणि त्या मुलाचा बळी घेतात. हे सगळेच भटके कुत्रे काही रेबीज झालेले नसतात. कारण नसताना हल्ला करणार्या अशा भटक्या कुत्र्यांची संख्या कशी आटोक्यात आणायची, हा एक मोठाच प्रश्न आहे. या कारणामुळे या भटक्या कुत्र्यांना आवरा रे, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. कर्नाटकलगत कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये नुकताच हत्तींमुळे उपद्रव सुरू झालेला आहे. हे हत्ती आपल्या राज्यात येऊन सावकाश गवत खाऊन जातील जर कोणाला काही आक्षेप असणार नाही. हे हत्ती येऊन शेतीची, घरांची प्रचंड नासधूस करतात. त्यांनी घरांवर केलेल्या हल्ल्यामध्ये माणसेही दगावली आहेत.
या महाकाय हत्तींना कसे आवरायचे, हा एक मोठाच अक्राळ विक्राळ प्रश्न आपल्या राज्यासमोर उभा राहिला आहे. अधून मधून शहरी भागामध्ये येणारे गवे, मगरी, लांडगे यांचे प्रमाण कमी असले तरी बिबटे, भटके कुत्रे आणि रानटी हत्ती यांच्यापासून राज्यातील जनतेला वाचवणे, हा प्रश्न अग्रक्रमावर येऊन उभा राहिला आहे, हे निश्चित.