तानाजी खोत
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांची विश्वबौद्धिक संपदा संघटनेच्या (डब्ल्यूआयपीओ) न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी (2025-2027) झालेली निवड भारतासाठी एक ऐतिहासिक आणि भूराजकीयद़ृष्ट्या महत्त्वाचा क्षण आहे. या पदावर निवड झालेल्या त्या पहिल्या आशियाई व्यक्ती आहेत. हे केवळ त्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेचे यश नाही, तर भारताचे बौद्धिक संपदा क्षेत्रात वाढलेले महत्त्व आणि जागतिक प्रशासनातील नेतृत्वाची पावती आहे.
आज बौद्धिक संपदा हा केवळ कायदेशीर, तांत्रिक विषय राहिलेला नाही. तो राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि भूराजकीय संबंधांचा केंद्रबिंदू बनला आहे. अर्थव्यवस्थेचे स्वरूप आता भौतिक वस्तूंच्या उत्पादनातून ज्ञानाधारित आणि डिजिटल संपत्तीकडे सरकले आहे. त्यामुळे देशाची खरी ताकद आता जमिनीवर किंवा नैसर्गिक संसाधनांवर नाही, तर नवकल्पना म्हणजेच इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये आहे. आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्या त्यांच्या बौद्धिक संपदेमुळे अब्जावधी डॉलर्सची मालकी ठेवतात. पेटंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्कमुळे या अमूर्त संपत्तीचे रक्षण होते.
5-जी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औषधनिर्मिती यांसारख्या क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्कांवरून आता राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये संघर्ष सुरू आहेत. ज्याच्याकडे अधिक सुरक्षित आणि प्रगत बौद्धिक संपदा असेल, तो देश जगावर राज्य करतोे. कोव्हिड-19 महामारीने सिद्ध केलेय की, लस आणि औषधांसारख्या महत्त्वाच्या बौद्धिक संपदा हक्कांवरून जगाची सार्वजनिक आरोग्य धोरणे ठरतात. म्हणूनच विकसनशील देशांसाठी, बौद्धिक संपदा धोरणांमध्ये सार्वजनिक हित आणि उत्पादनाचा अधिकार राखणे महत्त्वाचे आहे. हे हक्क हिरावण्याच्या जागतिक परिस्थितीत, न्यायमूर्ती सिंह यांच्या नेतृत्वामुळे भारताला योग्य वेळी जागतिक स्तरावर भूमिका मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.
न्यायमूर्ती सिंह यांनी भारतीय बौद्धिक संपदा कायद्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2017 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी त्यांनी प्रमुख कायदेतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पहिल्या बौद्धिक संपदा विभागाचे नेतृत्व यशस्वीरीत्या केले. देशातील आयपी खटले अधिक वेगाने हाताळण्यासाठी या विभागाने महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी पेटंट कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नियामक विचारांवर जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यगटाच्या सहअध्यक्ष म्हणूनही त्या काम करत आहेत. भारत आता ग्लोबल साऊथचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे औषधनिर्मिती आणि सार्वजनिक हिताचा समतोल राखण्यासाठी ही निवड अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. प्रतिभा सिंह यांच्या निवडीमुळे बौद्धिक संपदा विषयातील व्यवहारात भारत जगात केंद्रस्थानी आल्याने भारतासाठी हा नवा अध्याय सुरू झाला आहे.