एवढी दिवाळीच्या फराळाची चर्चा सुरू आहे की विचारता सोय नाही. आजच्या रेसिपीज फक्त भगिनीवर्गासाठी आहेत. दिवाळीत असे पदार्थ केले पाहिजेत की पुन्हा पुढील वर्षी कुणी घरी फराळ बनवा म्हणून विषयसुद्धा काढला नाही पाहिजे. बोट लावले तर भसकन फुटणारे लाडू तर कुणीही बनविल, पण यादगार लाडू असे तयार करा.
1) कर्तव्य-कठोर लाडू : पाकाची चाचणी बिघडवून तयार करावयाचे हे लाडू आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे बहुविध उपयोगी असतात. पाषाणसदृश्य कठोरतेमुळे हे एका बसणीत कुणीही खावू शकत नाही. असे लाडू समोरच्या दातांनी टोकरुनच खावे लागतात, सबब असे लाडू महिनोंमहिने टिकतात. वेळ प्रसंग आल्यास मुलांना क्रिकेट खेळताना त्यांचा चेंडू म्हणून उपयोग होवू शकतो. ब्याट तुटेल पण चेंडू लाडू फुटणार नाही याची हमी असते. आजकाल महिलांची पर्स, मंगळसूत्र किंवा चेन, सायकल/मोटारसायकलवरील चोराने ओढून नेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. चोराला पकडणे शक्य नसते कारण तो वेगाने सायकल किंवा बाईक दामटीत पळून जातो. कर्तव्य-कठोर लाडू महिलांनी नेहमी पर्समध्ये सोबत बाळगावेत. अशा प्रसंगी उपयुक्त सिद्ध होतात. अशी वेळ आलीच तर तात्काळ पर्समधील कर्तव्य-कठोर लाडू काढून चोराच्या टाळक्याच्या दिशेने नेम धरून फेकल्यास चोराचा कपाळमोक्ष होवून तो धारातीर्थी पडू शकतो.
2) बेधडक चकल्या: चकल्या शक्यतो नव्हे तर नेहमी विकतच आणाव्यात. क्वचित कधी नवरा आणि मुले चकल्या घरी करण्याचा आग्रह करतील तर या चकल्या जरूर तयार कराव्यात. नवरा असा आग्रह नेहमीच करण्याची शक्यता असते कारण कधीकाळी म्हणजे बालपणी त्याच्या आईने त्याला खमंग चकल्या खावू घातलेल्या असतात आणि तो ती चव विसरायला तयार नसतो.
कृती : चकलीची भाजणी अशी करावी की चकलीने “वाकेन पण मोडणार नाही” असा बाणा कायम ठेवला पाहिजे.गोल चकली पूर्ण उलगडून न तुटता अर्धा फुट लांबीची झाली पाहिजे.अशा चकल्या खाताना त्यात प्लास्टिक, रबर वगैरेंचा वापर केला आहे की काय अशी शंका सर्वांना वाटली पाहिजे.तन्मयतेने चघळल्याशिवाय चकलीने आपला आकार बदलता कामा नये. अशा चकल्या संपल्याच नाहीत तर रिकामपणाचा चाळा म्हणून चघळण्यासाठी कॉलनी मधील कुत्र्यांना वाटून टाकाव्यात. अनुभवी कुत्री अशा चकल्या दिसताच जीवाच्या आकांताने धूम ठोकतात.
उप-पदार्थ : या चकल्या हमखास उरतातच. उरलेल्या चकल्या दोन-तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवून त्याचा लगदा करावा. लगदा मिक्सरमधून काढून त्यात कांदे, पुदिना पाने, जिरे आणि किंचितसा हिंग टाकून त्याची भजी करावीत. अशा भज्यांना अनुभवी कुत्रीसुद्धा फसतात.दिवाळीच्या शुभेच्छा॥।