एकंदरीत सध्या प्राण्यांना चांगले दिवस आले आहेत, असे म्हणावे लागेल. राजकारणामध्ये प्राण्यांच्या अनेक उपमा नेहमी वापरल्या जातात. जनता बिचारी मेंढरांसारखी असते. मेंढ्यांचा कळप तुम्ही पाहिला, तर हजार एक मेंढ्यांच्या मागे जेमतेम एक किंवा दोन माणसे आणि एक-दोन कुत्री लक्ष ठेवण्यासाठी असतात. समोरच्या मेंढ्यांना एक दिशा दिली की, बाकीच्या मेंढ्या अजिबात विचार न करता त्यांच्या मागे चालतात. त्यामुळे जनतेला मेंढ्यांची उपमा दिली जाते. ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी जनतेची आणि मेंढ्यांची सारखीच परिस्थिती असते. एखादा नेता आपल्या भूमिका सतत बदलत असेल, तर त्याला सरड्याची उपमा दिली जाते. जशी परिस्थिती व पार्श्वभूमी आहे त्याप्रमाणे काही सरडे रंग बदलत असतात. ते ज्या रंगात, परिस्थितीत जातात त्या रंगाशी जुळवून घेतात.
सरड्याच्या याच गुणधर्माचा वापर नेतेही करतात. किंबहुना निवडणूक काळात तर आयाराम-गयाराम यांची चलतीच असते. काही नेते कधी या बाजूने, तर कधी त्या बाजूने असतात. अशा लोकांना दुतोंडी सापाची उपमा दिली जाते. दुतोंडी सापांना दोन तोंडे असतात आणि ते दोन्ही तोंडाने विषप्रयोग करू शकत असतात. यापूर्वी अजगराची देखील उपमा देऊन झालेली आहे. त्यामुळे तिचेही काही विशेष वाटत नाही; पण आता लेटेस्ट ताजीताजी उपमा आहे ती म्हणजे ‘अॅनाकोंडा’ची. अॅनाकोंडा हा अॅमेझॉनच्या जंगलात आढळणारा लांबलचक साप. लांबीने जास्त असल्याने त्याची क्षमताही जास्त. त्याच्या या गुणधर्मावरून तो राजकारणात टीका करण्यासाठी फिट बसणारा प्राणी ठरला आहे.
आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे राज्यभर आपल्याला अशा प्राण्यांची उपमा दिलेली ऐकायला येणार आहे. या काळात पिसाळलेले कुत्रे, चिखलात लोळणारी डुकरे, माजलेले पोळ, देवाला सोडलेले गोर्हे अशा संबोधनांची राजकारणामध्ये रेलचेल होऊ शकते. झालंच तर, आपल्या पक्षातील अत्यंत निष्ठावान असा नेता दुसर्या पक्षात गेला, तर इतके दिवस तो अस्तनीतला साप होता असे म्हटले जात असे. असे प्राणीही आता बाहेर पडताना दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे राज्यातील हे प्राणी संग्रहालय विस्तारत जाईल, यात काही शंका नाही.