सोमाटणे : शिरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्याने पाचवीचा वर्ग सुरू करण्यास शासनाने नैसर्गिक वाढीने मान्यता दिल्याने व शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम राबविणार असल्याने शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. शासनाच्या सीबीएसई पॅटर्नमुळे एक प्रकारे शिरगाव येथील झेडपीच्या शाळेला बूस्ट मिळाला आहे. शाळेला संजीवनी मिळाली आहे. शाळेची पटसंख्या वाढल्याने मुलांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून निघाली.
ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या ठरावानुसार सर्व प्रक्रिया राबवून शिरगाव येथे पुन्हा नव्याने पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच दरवर्षी पुढील वर्ग वाढणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून सीबीएससी अभ्यासक्रम राबविण्याचे धोरण राबविल्याने शाळेत चालू वर्षी पहिलीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वी वीसच्या आसपास आलेली पटसंख्या आता 100 पार झाली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार आदीं बरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. शाळेमध्ये शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांबरोबर विविध खेळ व उपक्रम घेण्यात येत असल्याने पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कल वाढला आहे. वर्ग वाढल्यामुळे पट वाढेल, पट वाढल्यामुळे शाळेतील शिक्षक वाढून शाळेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
वर्ग मान्यता कामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नायकडे, मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, केंद्रप्रमुख अशोक मिसळ, सरपंच पल्लवी गोपाळे, ग्रामसेवक नामदेव चव्हाण, उपसरपंच संध्या गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील अरगडे, वैशाली गोपाळे, समीर अरगडे, अक्षय गोपाळे, श्रीधर गोपाळे, रोहिणी गोपाळे, पूजा गोपाळे, योगिता वाघमारे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास आंबेनगरे आदीसह ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक नारायण कांबळे, सहशिक्षिका आशा काटकर व अर्चना कुंभारकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.