पिंपरी: शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये भटक्या श्वानांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामध्ये तीन श्वानांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएएस 325 व प्राण्यांवरील क्रुरते विरोधातील कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आला.
वरिष्ठ निरीक्षक वनिता धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँथिया ही गृहनिर्माण संस्था शहराच्या मुख्य चौकात असून, ती मध्यम व उच्च मध्यमवर्गीय नागरिकांची सोसायटी आहे. मागील काही दिवसांपासून सोसायटीमध्ये भटक्या श्वानांना खायला घालण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये वाद सुरु होते.
चार दिवसांपूर्वी काही रहिवाशांनी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे तोंडी तक्रार करून, श्वानांमुळे मुलांना खेळायला पाठवताना अडचणी येतात, वृद्धांवर हल्ले होतात व वाहनांचे नुकसान होते, असे सांगितले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा सोसायटीच्या आवारात भटक्या श्वानांना खायला घालण्यात आलेल्या अन्नामध्ये विष मिसळल्याचे निदर्शनास आले.
प्राणीहक्क कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अज्ञात व्यक्तींनी एकूण अकरा श्वानांना विषबाधित अन्न दिले. त्यातील तीन श्वानांचा मृत्यू झाला असून काही श्वानांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत श्वानांचे मृतदेह औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवले असून, दोन श्वानांचे शवविच्छेदन रविवारी करण्यात आले. संबंधित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
काय आहेत प्राणीमित्रांच्या मागण्या
विषप्रयोग झालेल्या श्वानांवर योग्य वैद्यकीय उपचार करण्यात यावेत.
या घटनेला जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
श्वानांना खायला घालणार्या फिडर व्यक्तीस अपळारश्र थशश्रषरीश इेरीव ेष खपवळर (-थइख) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संरक्षण मिळावे.
सोसायटीमध्ये प्राणी संरक्षणाचे कायदे काटेकोरपणे राबवावेत.
नऊ श्वानांवर विषप्रयोग झाल्याची प्राथमिक तक्रार आहे. त्यातील तीन श्वानांचा मृत्यू झालेला आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपासानंतर दोषी व्यक्तीची ओळख स्पष्ट होईल.- वनिता धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संत तुकाराम नगर