Pimpri Politics: पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि.29) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 67 उमेदवारीअर्ज दाखल करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या इच्छुकांनी अर्ज दाखल करत बंडखोरीचे संकेत दिले आहेत. मंगळवारी सर्वाधिक 30 अर्ज पिंपरी मतदारसंघातून भरण्यात आले आहेत.
पिंपरी मतदारसंघ
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरीत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अर्ज दाखला केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षाचे माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आरपीआयचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, काँग्रेसचे माजी नगरसेवक काळूराम पवार, शिवसेनेचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे.
ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे मनोज गरबडे यांनी अर्ज सादर केला आहे. मंगळवारी दिवसभरात एकूण 30 उमेदवारांनी अर्ज भरले. आतापर्यंत एकूण 39 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
चिंचवड मतदारसंघ
राज्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी गटनेते राहुल कलाटे यांनी उमेदवारीअर्ज भरला. या वेळी त्यांनी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी बंडखोरी करीत पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीकडून अर्ज दाखल केला आहे. तसेच, माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून अर्ज भरला आहे. मंगळवारी 19 जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 32 जणांनी अर्ज भरले आहेत.
भोसरी मतदारसंघ
भोसरी मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीअर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्यासह मंगळवारी 18 जणांनी उमेदवारीअर्ज दाखल केला. आतापर्यंत एकूण 24 जणांनी अर्ज भरले आहेत.
तीनही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षातील इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकार्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांनी बंडखोरी करीत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निशाण फडकावले आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर अर्ज मागे घेणार की, उमेदवारी कायम ठेवणार हे सोमवार (दि. 4) पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे; मात्र अनेक बंडखोरांनी उमेदवारी मागे घेणार नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काहींची विजयाची गणिते बिघडू शकतात.