पिंपरी : अनेकांना इच्छा असूनही कामाच्या व्यापामुळे तसेच कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याच्या जबाबदारीमुळे शिक्षण अपूर्ण राहते. इतरांसारखे आपणही शिकावे ही भावना मात्र स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे अशा शिक्षणवेड्यांसाठी शहरात चार ठिकाणी इव्हनिंग लर्निंग सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्याद्वारे शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांना आपले स्वप्न पूर्ण करता येऊ शकते.
उदा. क्र. 1)
मी शाहीन शेख माझे लवकर लग्न झाल्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिले. मला पिंपरीतील मासूम संस्थेच्या इव्हनिंग लर्निंग सेंटरविषयी कळाले आणि मी येथे मी दहावीसाठी प्रवेश घेतला. शिक्षणातील 17 वर्षांच्या खंडानंतर मी दहावीची परीक्षा पास झाले. आता यंदा बारावीची परीक्षा देणार असून सध्या मी डिप्लोमाला देखील प्रवेश घेतला आहे. मासूममुळे मला माझे अपूर्ण शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत आहे.
उदा.क्र. 2) मी भूषण शिर्के मला पण दहावीची परीक्षा द्यायची होती. मी बर्याच शाळांमध्ये सतरा नंबरचा फॉर्म भरायला गेलो पण भरला गेला नाही. चार वर्षे प्रयत्न करत होतो; परंतु यश मिळाले नाही. पिंपरीतील खासगी शाळेत मी माझ्या भाचीला सोडायला जायचो. याठिकाणी इव्हनिंग लर्निंग सेंटरविषयी माहिती कळाल्यानंतर येथे प्रवेश घेतला. वयाच्या 35 व्या वर्षी मी दहावीची परीक्षा पास झालो. मासूममुळे आमचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले.
शिक्षण अपूर्ण राहिलेल्या अशा अनेकजणांचे अनुभव याठिकाणी ऐकायला मिळतात. मासूम या संस्थेतर्फे रात्र शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करते. जे दिवसभर काम करतात ते याठिकाणी येवून शिक्षण घेतात. 2021 पासून शहरात या सेंटरची सुरुवात झाली असून 450 शिक्षणापासून वंचित मुलांनी दहावीची परीक्षा दिली आहे. शहरात संस्थेचे पिंपरी, निगडी, भोसरी याठिकाणी इव्हिनिंग लर्निंग सेंटर आहेत. सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत मुलांना शिकविले जाते. याठिकाणी मुलांना मोफत शिक्षणाची सुविधा आहे.
शहरात चिंचवड स्टेशन येथे शासकीय एकच रात्रशाळा आहे. त्यामुळे इतर उपनगरातील मुलांना लांब रात्रशाळेत यायला जमत नाही. त्यामुळे शिकण्याची इच्छा असणारी बहुतांश मुले शिक्षणापासून वंचित होती. या मुलांना त्यांच्या घराजवळच एखादे लर्निंग सेंटर उपलब्ध केले तर त्यांच्या शिक्षणाची सोय होवू शकते. हा विचार संस्थेने केला आणि अशा मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी सेंटर उपलब्ध करुन दिले.
फक्त दहावी आणि बारावी पास करणे एवढाच हेतू नसून संस्थेच्या माध्यमातून त्यांना करिअर सेल डिपार्टमेंटमधून शॉट टर्म कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी संस्थेकडून आर्थिक मदत देखील केली जाते. आज दहावी पास केलेले विद्यार्थी शिक्षणाबरोबरच शॉर्ट टर्म कोर्स देखील करत आहेत.