पुढारी ऑनलाईन डेस्क : एका बलात्कार प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडितेला कथित गुन्ह्यासाठी जबाबदार धरत संशयित आरोपीला जामीन मंजूर केला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नाेंदवला आहे. तसेच न्यायाधीशांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे, असेही स्पष्ट केले आहे.
एका विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने आरोप केला होता की, तिला एका बारमध्ये भेटलेल्या एका तरुणानेने ती दारूच्या नशेत असताना तिच्यावर बलात्कार केला. तर, आरोपीने जामीन अर्जात म्हटलं होतं की, महिलेने स्वतः त्याच्यासोबत जाण्यास सहमती दर्शविली होती. त्यानंतर संहमतीने लैंगिक संबंध झाले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुमार सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आरोपीला ११ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली. आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायाधीश संजय कुमार सिंह यांनी म्हटले होतं की, "तरुणीने स्वतःच संकटाला आमंत्रण दिले होते. या कथित घटनेसाठी ती जबाबदार आहे."
जामीन मंजूर करणे हा प्रत्येक प्रकरणातील तथ्यांवर अवलंबून न्यायाधीशांचा विवेक असला तरी, तक्रारदाराविरुद्ध असे अनावश्यक निरीक्षण टाळले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित मुलीच्या पायजम्याची दोरी तोडून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करणे बलात्काराचा प्रयत्न नाही, असे ठरवलेल्या एका प्रकरणाच्या स्वतःहून केलेल्या खटल्याच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
बलात्कार प्रकरणी जामीन मंजूर केला जाऊ शकतो; पण 'तिने स्वतःच संकटांना आमंत्रण दिले' अशी टिपण्णी कशी काय होवू शकते? विशेषतः न्यायाधीशांनी असे बोलताना काळजी घेतली पाहिजे," असे न्यायमूर्ती गवई यांनी नमूद केले.