पाटणा; वृत्तसंस्था : राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठीच काँग्रेसने छठमैयाचा अपमान केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. कटिहार येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक छटमैयाचा अपमान केला. याचा राजदला निवडणुकीत फटका बसणार आहे. राजदचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडून ही खेळी केल्याचा दावा मोदी यांनी केली. ते पुढे म्हणाले की, तुम्ही राजद-काँग्रेसचे पोस्टर पाहा. त्यांच्या पक्षाच्या जुन्या नेत्यांचे फोटो पोस्टरवरून गायब आहेत. त्यांना आपल्या वडिलांचे नाव सांगायलाही लाज वाटत आहे. असे कोणते पाप आहे जे आरजेडीवाले बिहारच्या तरुणांपासून लपवत आहेत? या लोकांच्या पोस्टरमधून काँग्रेस जवळपास गायब आहे.
‘डबल इंजिनच्या एनडीए सरकारचा मोठा फायदा हा आहे की, दिल्ली आणि पाटण्याहून निघालेला प्रत्येक पैसा थेट तुमच्या खात्यात पोहोचतो. कोणीही चोर-लुटारू तो लुटू शकत नाहीत. नाहीतर इथे एक बिहारमधील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे आणि दुसरे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. हे राजद आणि काँग्रेसवाले तुमच्या हक्काचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. ते तुमच्या हक्काचा पैसाही लुटतात,’ असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, ‘तुमच्या आई-वडिलांनी तो काळ पाहिला आहे. पोलिसांचा जीव धोक्यात असायचा. मागास, अतिमागास वर्गासोबत काय-काय होत नव्हते. जंगलराजमध्ये सर्वांचा जीव धोक्यात होता. प्रत्येक अधिकारी, प्रत्येक ठेकेदार घरातच बसून राहायचा.’
2005 मध्ये राज्यातून सत्तेतून पदच्युत झाल्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारवर दबाव आणून बिहारमधील विकास प्रकल्प थांबवले होते, असा आरोप मोदी यांनी केला. ‘आताच्या निवडणुकीत, बिहारमध्ये ज्या काँग्रेसची राजकीय ताकद आधीच संपली आहे, त्या पक्षाने राजदला बुडवण्याची शपथ घेतली आहे,’ असा दावा त्यांनी केला.