नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशियाने पाकिस्तानला जेएफ-17 थंडर ब्लॉक-3 या लढाऊ विमानांमध्ये बसवण्यासाठी आरडी-93 एमए इंजिन पुरवत असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. अशा कोणत्याही घडामोडीला दुजोरा मिळालेला नाही. रशिया-भारत संबंधांवर लक्ष ठेवणार्या गंभीर निरीक्षकांसाठी ही कल्पना अतार्किक आहे. आमचे पाकिस्तानसोबत अशा पातळीवर सहकार्य नाही की, ज्यामुळे भारताला अस्वस्थ वाटेल, अशी माहिती रशियाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
यापूर्वी, रशियाकडून पाकिस्तानला लष्करी मदत मिळत असल्याच्या मीडिया वृत्तांवरून काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली होती. रशियासारखा ऐतिहासिकद़ृष्ट्या विश्वासू सामरिक भागीदार पाकिस्तानला लढाऊ विमानांचा पुरवठा का करीत आहे, असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्र सरकारला केला होता. या पार्श्वभूमीवर रशियाने हा खुलासा केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला होणार्या भारत दौर्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुतीन यांनी मोदींची एक संतुलित, ज्ञानी आणि राष्ट्रकेंद्रित नेते म्हणून प्रशंसा केली.