उद्योगमंत्री उदय सामंत Pudhari News Network
राष्ट्रीय

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल : उद्योगमंत्री उदय सामंत

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

केंद्र सरकारच्या वतीने आयोजित उद्योगासंदर्भात एक महत्त्वाची परिषद दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रासह प्रत्येक राज्याने आपापले सादरीकरण केले. यामध्ये थेट परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. असा दावा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. तसेच बुधवारी (दि.5) झालेल्या कॅबिनेट उपसमितीच्या बैठकीत दीड लाख कोटींच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली, अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली.

राजधानी दिल्लीत एका परिषदेसाठी आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. मंत्री उदय सामंत म्हणाले की, देशातील क्रमांक एकचे बंदर महाराष्ट्रात होत आहे. तसेच कोकणात दिघी बंदर आहे, त्याला औद्योगिक शहर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र मागच्या तीन वर्षात परकीय गुंतवणुकीत मागे होता मात्र आता प्रथम क्रमांकावर आला आहे आणि उद्योगातही अग्रेसर असून राज्यात उद्योग आणण्यासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारही प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

उदय सामंत म्हणाले की, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीच केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या विषयावर माफी मागितली आहे. मात्र विरोधक याप्रकरणी राजकारण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले.

उदय सामंत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती हाच आमचा चेहरा असणार आहे आणि आगामी काळात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. दूसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून बोलताना काल शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीलाच घरचा अहेर दिला आहे. ठाकरे गटालाही स्वतःचे मत राहिले नसल्याचे म्हणत त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT