जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. file photo
राष्ट्रीय

Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमागे 'लष्कर-ए-तोयबा'च्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा हात

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत २ सुरक्षा जवान शहीद झाले. तर सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पहिली चकमक मोदरगाम गावात झाली. येथील चकमकीदरम्यान लान्स नाईक प्रदीप नैन, पॅरा कमांडो शहीद झाले. गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली होती. यादरम्यान लपून बसलेल्या किमान दोन ते तीन दहशतवाद्यांना गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबाचा मोस्ट-वॉन्टेड दहशतवादी साजिद जट्टचा हात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी X वरील पोस्टवर दिलेल्या माहितीनुसार, "कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम गावात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दल येथे आहे. लवकरच याबाबत पुढील तपशील देऊ."

सुरक्षा दलांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर फ्रिसल चिन्निगाम गावात दुसरी एक चकमक सुरु झाली. फस्ट राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार राज कुमार यांना ऑपरेशन दरम्यान प्राण गमवावे लागले. एका दहशतवाद्याला या ठिकाणी घेरले आहे.

दोन गावांत चकमकी, ६ दहशतवाद्यांचा खात्मा

मोदरगाम आणि चिन्नीगाम या दोन गावांमध्ये या चकमकी झडल्या. कुलगाम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर शनिवारी पहाटेच सुरक्षा दलांनी पोलिस व लष्करी जवानांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. त्यात चिन्नीगाम येथे सर्वात मोठी चकमक झडली. एका घरात दडून बसल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या घराला वेढा टाकला; पण आतील दहशतवाद्यांनी जवानांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात एकूण ६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मृत दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा विभागीय कमांडर फारूक नल्ली याचाही समावेश आहे.

"मोदरगाम येथील चकमकीच्या ठिकाणी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत तर चिन्निगाम येथे चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत," असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानमधून रचत आहे हल्ल्याचा कट

सुरक्षा एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ली वाढलेल्या दहशतवादी कारवायांमागे लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानमधील सुत्रधार द रेझिस्टन्स फ्रंट आहे. सैफुल्लाह साजिद जट्ट हा पाकिस्तानच्या पंजाबमधील कसूर जिल्ह्यातील शानगंगा गावचा आहे. तो कट्टर दहशतवादी आहे, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) म्हटले आहे. त्याला पकडण्यासाठी १० लाखांचे बक्षीस आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जट्ट हा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील बेस कॅम्पमधून कार्यरत आहे. त्याची पत्नी भारतीय वंशाची असून ती त्यांच्यासोबत राहते, असेही त्यांनी सांगितले. त्याने यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये काम केले आहे आणि सध्या तो लष्कर-ए-तोयबाची भरती आणि दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

साजिद जट्ट एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत

साजिद जट्ट हा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनल कमांडर मानला जातो. तो दहशतवादी फंडिंग हाताळतो. त्याचा एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश आहे. तो जम्मू-काश्मीरमध्ये कासिम नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. त्याचा शोध सुरू आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीर खोऱ्यात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे जटचा हात असल्याचा संशय आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT