Jagannath Rath Yatra 2025  file photo
राष्ट्रीय

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेत ३ हत्ती बिथरले; सैरावैरा धावू लागले, अनेकजण जखमी, पाहा थरारक व्हिडीओ

Ahmedabad Rath Yatra elephants out of control viral video : गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथ यात्रेत आज सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली.

मोहन कारंडे

Jagannath Rath Yatra 2025

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेत आज (दि. २७) सकाळी थरकाप उडवणारी घटना घडली. रथयात्रेत सहभागी झालेले तीन हत्ती अचानक बिथरले आणि गर्दीतून सैरावैरा धावू लागले. या अनपेक्षित गोंधळामुळे हजारो भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले, यात अनेकजण जखमी झाले. काही वेळ ही भव्य यात्रा भयावह परिस्थितीत बदलली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रथयात्रेच्या मार्गावर धावपळ

शुक्रवारी सकाळी १०.१५ वाजता रथयात्रा शहरातील खाडिया परिसरातून जात असताना ही घटना घडली. रथयात्रेच्या मार्गावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. "एका क्षणी आम्ही जल्लोष करत होतो आणि दुसऱ्याच क्षणी हत्ती आमच्या दिशेने धावत होते," असे यात्रेत सहभागी झालेले भाविक रमेश भाई यांनी सांगितले. "प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी धावत होता. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. काही वेळ काय होत आहे, हेच कळत नव्हते" असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे रथयात्रेच्या मार्गावर काही काळ गोंधळ आणि धावपळ सुरू होती.

मोठा अनर्थ टळला

पोलिसांनी लोकांना लांब राहण्याचे आवाहन केले. माहूतांनी हत्तीचा पाठलाग केला आणि त्यांना नियंत्रणात आणले. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. पोलीस आणि स्वयंसेवकांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हत्तींना आणखी चिथावणी मिळू नये म्हणून तात्काळ शिट्ट्या वाजवणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. "ते खूप भयानक होते, पण पोलीस आणि माहूतांनी वेगाने कारवाई केली," असे मीना पटेल या भाविक महिलेने सांगितले. "त्यांनी हत्तींना इंजेक्शन देऊन शांत केले. कोणीही गंभीर जखमी झाले नाही, हा एक चमत्कारच आहे," असे त्या म्हणाल्या.

या घटनेपूर्वी, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते पवित्र पहिंद विधी पार पाडल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुटुंबासह जमालपूर जगन्नाथ मंदिरात मंगला आरतीमध्ये सहभागी झाले होते. या भव्य मिरवणुकीत १८ हत्ती, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे १०१ ट्रक, ३० आखाडे आणि १८ भजनी मंडळांचा समावेश होता. मात्र, या अनपेक्षित घटनेमुळे यात्रेला काही काळासाठी गालबोट लागले. सुदैवाने, प्रशासनाच्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला आणि भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT