हरियाणात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी file photo
राष्ट्रीय

हरियाणात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये

90 जागा असलेल्या हरियाणा विधानसभेसाठी 4 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होत आहे. पाठोपाठ चार दिवसांमध्ये 8 ऑक्टोबरला निकाल येणार आहे. याच दिवशी जम्मू-काश्मीर विधानसभेचाही निकाल येणार आहे. हरियाणामध्ये गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी आहे, असे ढोबळमानाने बोलले जाते. मात्र, परिस्थिती अगदीच तशी नाही. यापूर्वीही काही राज्यांच्या निवडणुकीत अशा विचारामुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. हरियाणामध्ये निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी भाजप नेतृत्वाने सरकारचे नेतृत्व मनोहरलाल खट्टर यांच्याकडून नायब सिंह सैनी यांच्याकडे दिले. थोडक्यात, नेतृत्व बदल करत सत्ता किंवा नेतृत्व विरोधी भावनेचा फटका बसणार नाही, याची काळजी भाजप नेतृत्वाने घेतली. याउलट काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत गटबाजी धुसफुसत आहे.

हरियाणा काँग्रेसमध्ये अनेक नेते प्रमुख नेते आहेत, हीच काँग्रेसची मोठी समस्या आहे. एकीकडे भाजपमध्ये म्हणावा तसा राज्यव्यापी चेहरा नाही, तर काँग्रेसमध्ये अनेक राज्यव्यापी चेहरे आहेत आणि म्हणूनच उमेदवारी वाटप करताना काँग्रेसच्या कोणत्या गटाला किती जागा देण्यात आल्या, याचीही चर्चा दिल्लीसह हरियाणाच्या राजकीय वर्तुळात होत आहे. काँग्रेसमध्ये भूपेंद्रसिंह हुड्डा, कुमारी शैलजा, रणदीपसिंह सुरजेवाला, उदय भान असे प्रमुख नेते आहेत तर भाजपकडे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर हेच चेहरे आहेत. स्थानिक राज्यव्यापी चेहरा नसल्यामुळे भाजपची बर्‍यापैकी मदार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहर्‍यावर आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्या नाराजीवरूनही हरियाणामध्ये काँग्रेसला फटका बसू शकतो, अशी शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कुमारी शैलजा यांना बोलवून त्यांची नाराजी दूर करत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीत घटक पक्ष असलेला आम आदमी पक्ष देखील या निवडणुकीत काँग्रेससह भाजपच्याविरुद्ध दंड थोपटून उभा आहे. त्यामुळे हरियाणामधील लढत ही दुरंगी नसून, काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आम आदमी पक्ष अशी तिरंगी आहे. या तिरंगी लढतीत आम आदमी पक्ष कुणाची मते आपल्या बाजूने वळवणार, त्यावरूनही काही जागा जिंकण्याचे निकष बदलू शकतात.

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस असली तरी काँग्रेसने जातीय आणि सामाजिक समीकरण व्यवस्थितपणे जुळवून घेतले आहे. सोबतच शेतकरी बांधवांमध्ये भाजप विरोधी सूर पेरण्यात काँग्रेसला काही प्रमाणात यश आले आहे. भाजपला आपल्या बाजूने जातीय, सामाजिक समीकरणे म्हणावे तसे जुळवून आणता आले नाहीत. काँग्रेसने विनेश फोगाट सारखे उमेदवार देऊन महिलाविरोधी पक्ष म्हणत भाजपवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्याला भाजपकडून अपेक्षित प्रत्युत्तरही देता आले नाही. अंतर्गत गटबाजी असली तरी ती शमवण्यात काही प्रमाणात काँग्रेसला यश आले आहे.

भाजपकडून सूक्ष्म नियोजन

दुसरीकडे भाजप कुठलीही निवडणूक ही अत्यंत नियोजनपूर्वक लढत असतो. त्यामुळे प्रत्येक संभाव्य धोक्याची कल्पना करत भाजपने निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले आहे. काँग्रेस याबाबतीत कमकुवत आहे. केवळ दहा वर्ष भाजपची सत्ता होती, त्यामुळे भाजपविरोधी भावनेतून काँग्रेसला लोक मतदान करतील, असा विचार केल्यास काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेसने यावर विचार न केल्यास काँग्रेसला काही अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT