सूप्रीम कोर्ट  pudhari
राष्ट्रीय

रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court : बाल तस्करी रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बाल तस्करी रोखण्यासाठी आणि बाल तस्करीच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी मंगळवारी (15 एप्रिल) व्यापक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. एखाद्या रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेले किंवा तस्करी झाल्याचे आढळले. तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणे पहिले पाऊल असावे, असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सर्व राज्यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयांनी बाल तस्करीची प्रकरणे ६ महिन्यांत सोडवावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

बाल तस्करीची प्रकरणे न्यायालयांनी ६ महिन्यांत पूर्ण करावी

न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने देशभरातील उच्च न्यायालयांना बाल तस्करीच्या प्रकरणांमध्ये प्रलंबित खटल्यांची स्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले. बाल तस्करी प्रकरणाचे खटले सहा महिन्यांत पूर्ण करावे आणि दैनंदिन खटला चालवावा असे निर्देश कनिष्ठ न्यायालयांना उच्च न्यायालयांनी द्यावेत असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कोणतीही हलगर्जीपणा केल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असे खंडपीठाने म्हटले. उत्तर प्रदेशातील बाल तस्करी प्रकरणातील आरोपींनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जांवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.

सदर प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका जोडप्याने ४ लाख रुपयांना तस्करी केलेले बाळ खरेदी केले. कारण त्यांना मुलगा हवा होता. या प्रकरणात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, जो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर तुम्हाला मुलगा हवा असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही चोरीचे मूल विकत घ्यावे. त्यांना माहित होते की मूल चोरलेले आहे, तरीही त्यांनी त्याला दत्तक घेतले.

बाल तस्करीचे आरोप समाजासाठी गंभीर धोका

सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालय आणि उत्तर प्रदेश सरकारला या प्रकरणाची हाताळणी करण्याच्या पद्धतीबद्दल फटकारले. उच्च न्यायालयाने जामीन अर्जांवर निष्काळजीपणे काम केले आणि त्यामुळे अनेक आरोपी फरार झाले. हे आरोपी समाजासाठी गंभीर धोका आहेत. जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने किमान दर आठवड्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्याची अट घालण्याची आवश्यकता होती, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT