प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
राष्ट्रीय

हरियाणा विधानसभा निवडणूक पुढे ढकलली

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आज (दि. ३१ ऑगस्‍ट )घेतला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते आणि ४ ऑक्टोंबर रोजी दोन्ही राज्यांतील निकाल जाहीर होणार होता. मात्र, हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. तर जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान अगोदर ठरल्याप्रमाणे १ ऑक्टोंबर रोजी होईल. या दोन्ही राज्यांतील निकाल ८ ऑक्टोंबर रोजी जाहीर केले जातील, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला.

'या' कारणामुळे मतदान तारखेत केला बदल

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सम्राथल गावात आयोजित केलेल्या जत्रेत सहभागी होण्यासाठी बिश्नोई समाज मोठ्या संख्येने जातो. हा समाज १ ऑक्टोबरला आपली यात्रा काढणार आहे. अशा स्थितीत हा समाज निवडणुकीच्या दिवशी मतदानापासून वंचित राहणार आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय आयोगाने घेतला.

ऑगस्ट रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यांनी सांगितले होती की, १ ऑक्टोंबर रोजी मंगळवार येत आहे. त्याअगोदर शनिवार, रविवार आणि नंतर गांधी जयंतीची सुट्टी येत आहे. या सुट्ट्यांसाठी लोक बाहेर जातील. परिणामी मतदानाची टक्केवारी कमी होईल. म्हणून आयोगाने निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी केली होती. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, निवडणूक उमेदवारी दाखल करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT