पाटणा; वृत्तसंस्था : राष्ट्रीय जनता दल (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानाबाहेर रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून मोठा गदारोळ झाला. मधुबन विधानसभा मतदारसंघातून तिकिटासाठी इच्छुक असलेले मदन प्रसाद साह यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी रस्त्यावर लोळण घेतली, कपडे फाडले आणि तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला.
तिकीट विक्रीच्या आरोपांवर आरजेडी नेत्यांनी मौन बाळगले आहे. बिहार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी संपत आहे.
मदन प्रसाद साह यांनी तिकीट नाकारल्यामुळे लालू यादव यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन केले.
तिकिटासाठी 2.70 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा साह यांचा आरजेडी नेत्यांवर आरोप.
साह यांनी आरजेडी नेते संजय यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर टीका केली.
या आरोपांवर आरजेडीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
2020 मध्ये मधुबनमधून आरजेडीचे उमेदवार म्हणून थोड्या फरकाने हरलेले साह यांनी आरोप केला की, त्यांना तिकिटासाठी 2.70 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ‘लालू प्रसाद यादव यांनी मला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. आरजेडीचे नेते संजय यादव यांनी 2.70 कोटी रुपये मागितले. मी पैसे देण्यास नकार दिल्यावर तिकीट दुसर्याला देण्यात आले,’ असा दावा साह यांनी केला.
या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये साह कपडे फाडून, रस्त्यावर लोळण घेऊन आणि लालू प्रसाद यांच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहेत. त्यांनी तेजस्वी यादव यांच्यावरही टीका केली. ‘तेजस्वी यादव अहंकारी आहेत. तिकीट 2.70 कोटी रुपयांना विकले गेले,’ असे ते म्हणाले. तिकीट ‘भाजपचा एजंट’ असलेल्या संतोष कुशवाहा यांना देण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. साह यांनी रांची येथे लालू आणि तेजस्वी यांनी त्यांना तिकिटाचे आश्वासन दिल्याचेही सांगितले. विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून राजदला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भाजपने जोरदार टीका केली आहे.