Aqil Akhtar Murder Case : माझ्या मुलगा अकील अख्तर हा गेल्या 18 वर्षांपासून अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेला होता. तो गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्यांचा मुलगा ड्रग्जसाठी पत्नी आणि आईलाही त्रास देत होता, असा दावा पंजाबचे माजी डीजीपी (पोलीस महासंचालक) मोहम्मद मुस्तफा यांनी केला आहे. विशेष म्हणजे मुस्तफा हे 2018 मध्ये पंजाब पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विशेष कृती दलाचे (STF) प्रमुखही होते.अकील अख्तर मृत्यू प्रकरणी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी, माजी कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हादाखल झाला आहे.
अकील अख्तर हा 16 ऑक्टोबर रोजी पंचकुलामधील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली आणि तेव्हा कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नव्हती. मात्र, 20 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील मलेरकोटला येथील शमशुद्दीन चौधरी यांनी अख्तर यांच्या मृत्यूमध्ये संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पंचकुला येथील मनसा देवी कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनमध्ये माजी डीजीपी (पोलीस महासंचालक) मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी, माजी कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांच्यावर हत्येचा (कलम 103 (1)) आणि गुन्हेगारी कट रचल्याचा (कलम 61) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
प्राथमिक पोलीस तपासानुसार, अकील अख्तर याचा मृत्यू ब्यूप्रेनॉर्फिनचे जास्त इंजेक्शन घेतल्याने झाला. माजी डीजीपी मोहम्मद मुस्तफा यांनी त्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांवरील आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना मुस्तफा म्हणाले की, माझ्या मुलगा अकील अख्तर हा गेल्या 18 वर्षांपासून अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकलेला होता. तो गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्यांचा मुलगा ड्रग्जसाठी पत्नी आणि आईलाही त्रास देत होता. 2007 पासून आम्ही चंदीगडमधील पीजीआयएमईआरसह अनेक ठिकाणी त्याच्यावर उपचार केले; पण तो पुन्हा व्यसनाच्या जाळ्यात अडकला. एकदा तर त्याने आमच्या घरात आगही लावली होती," अशी माहिती मुस्तफा यांनी दिली. दरम्यान, व्हिसेरा नमुने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवले गेले असून, त्याचा अहवाल येण्यास दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तक्रारदार शमशुद्दीन चौधरी यांनी त्यांच्या तक्रारीत अकील अख्तरने कथितपणे रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ दिला आहे. या व्हिडिओमध्ये अख्तरने आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. "माझे कुटुंब मला खोट्या प्रकरणात अडकवेल किंवा मारून टाकण्याची त्यांची योजना आहे," असे त्याने म्हटले होते. तो नेहमी भ्रमित असतो किंवा त्याला भास होत आहेत, असे त्याचे कुटुंबीय वारंवार म्हणायचे, असा आरोपही त्याने केला होता.या संदर्भात बोलताना, डीसीपी सृष्टी गुप्ता यांनी सांगितले की, "मृत्यूच्या आधी मृताने कथितरित्या तयार केलेले काही सोशल मीडिया पोस्ट्स आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात वैयक्तिक वाद आणि जीवाला धोका असल्याचा उल्लेख आहे. 17 ऑक्टोबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि एसीपी-रँकच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे."
मुस्तफा यांनी तक्रारदार शमशुद्दीन चौधरी हे मलेरकोटला येथील 'आप' (आम आदमी पार्टी) आमदार मोहम्मद जमील उर रहमान यांचे 'माजी पीए' (खासगी सहायक) होते, असा दावा केला. लाचखोरीच्या आरोपांमुळे चौधरी यांना 'आप'मधून काढून टाकण्यात आल्याचेही मुस्तफा म्हणाले.दुसरीकडे, आमदार रहमान यांनी चौधरी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात काम केले होते, परंतु वर्षभरापूर्वीच त्यांना सोडण्यास सांगितले होते, असे स्पष्ट केले. तर चौधरी यांनी आपण केवळ आमदार रहमान यांचे मित्र होतो आणि रझिया सुलताना यांच्या कुटुंबाशी जुने संबंध असल्याने, अकीलसोबत जे घडले ते चुकीचे वाटल्याने ही तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. मी कोणावरही आरोप केलेला नाही. मी फक्त मृताने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओच्या आधारे निष्पक्ष तपासणीची मागणी करत आहे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी मंत्री रझिया सुलताना आणि त्यांची मुलगी निशात अख्तर यांनी फेसबुकवर एक संयुक्त निवेदन जारी करून त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याला 'गलिच्छ मानसिकता आणि क्षुद्र राजकारण' म्हटले आहे. राजकारण करणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून आमच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआर दाखल करणे हे पोलिसांचे कर्तव्य असले तरी, याचा अर्थ कोणताही गुन्हा सिद्ध झाला आहे असा होत नाही. आता तपास सुरू होईल आणि सत्य लोकांसमोर येईल. आम्ही लढण्यास तयार आहोत," असेही या निवेदनात म्हटले आहे.