कुर्नूल (आंध्र प्रदेश); पीटीआय : हे 21 वे शतक 140 कोटी भारतीयांचे आहे आणि स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत आपला देश विकसित भारत नक्की बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
देशाच्या ‘मेक इन इंडिया’ परिसंस्थेचे कौतुक करताना ते म्हणाले, सीमेपलीकडील दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईत आपण देशात बनवलेल्या वस्तूंची ताकद पाहिली आहे. आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे 13 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, 21 वे शतक भारताचेच असणार आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदींनी नंद्याल जिल्ह्यातील श्रीशैलम येथील श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथे त्यांनी पंचामृत वापरून रुद्राभिषेक केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी श्री शिवाजी स्फूर्ती केंद्राला भेट दिली. हे एक स्मारक संकुल असून येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1677 मधील ऐतिहासिक श्रीशैलम भेटीच्या स्मरणार्थ ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे.