यवतमाळ : मागील अनेक दिवसांपासून खाजगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या एका नराधम शिक्षकाने शिकवणीला येणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थीनीसोबत शारीरीक संबंध ठेवले. तिला गर्भवती केल्याने तिचा रविवार (दि.२१) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी नराधम शिक्षकाला पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखले करून अटक केली. उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरात ही घटना उघडकीस आली. दरम्यान समाजाला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
संदेश गुंडेकर (वय २७ रा. ढाणकी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या खाजगी शिकवणी वर्गात पिडीत विद्यार्थिनी ही मागील वर्षभरापासून जात होती. अशातच आरोपी नराधम शिक्षकाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत फुस लावून १ डिसेंबर २०२४ ते दि. १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अनेकदा तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले आणि पीडितेस गर्भवती होण्यास कारणीभूत ठरला. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून पीडितेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपीला भोकर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार पांडुरंग शिंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर अन्नमावर, रावसाहेब मस्के हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.