उद्योगमंत्री उदय सामंत file photo
नागपूर

नागपुरात महिलांसाठी एमआयडीसी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान येथे महिलांसाठी राज्यातील पहिली एमआयडीसी तयार होणार आहे. दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील, अधिसूचना जारी होणार आहे. यासोबतच हिंगणा, बुटीबोरीत आता जागा नसल्याने आमडी परिसरात नवी सुसज्ज एमआयडीसी उभारली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विधानसभा निवडणूकीपूर्वी राज्यात 'महाराष्ट्राची उद्योग भरारी' कार्यक्रमातून पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगारांची निर्मिती झाली याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली जात आहे. शुक्रवारी नागपुरातील हॉटेल सेंटर पॉईंट येथील कार्यक्रमातही उद्योजकांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचेही सादरीकरण झाले. या निमित्ताने उदय सामंत माध्यमांशी बोलत होते. आम्ही पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली, किती उद्योग सुरू झाले, किती रोजगारांची निर्मिती झाली याची माहिती देत आहोत. लाडकी बहीण या योजनेतून ४६ हजार कोटी रुपये महिलांना मिळणार असून शेवटी ही रक्कम गुंतवणूक, विविध वस्तू खरेदीसह बाजारातच येणार आहे.

राज्यातील सर्वच उद्योगांची उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. यामुळेच यात या योजनेचा समावेश केला. कुठलेही राजकारण नाही असेही उदय सामंत म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वीही विरोधकांनी संविधान बदलले जाणार, मुस्लिमांना देशाबाहेर काढले जाणार असे पसरवले नरेटीव्ह आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच आरक्षण संदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे संपल्याचे सामंत म्हणाले. विरोधकांची दुतोंडी भूमिका नागरिकांना समजली आहे. ज्या उद्योजकांनी एमआयडीसीत जमीन घेतली पण ती वापरलीच नाही ती परत घेतली जात असून विदर्भातील या प्रकारच्या जमिनीची आपण यादी देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी असलेल्या भाजप, शिवसेना, अजीतदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षाला आपल्याला विधानसभेत जास्तीत- जास्त जागा मिळाव्यात व आमचाच मुख्यमंत्री बनावा असे वाटते. त्यानुसार सारेच बोलतात. आम्हाला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. मात्र, महायुतीच्या पक्षांनी प्रथम विधानसभा निवडणूक जिंकून राज्यात सत्तेवर येण्याचे निश्चित केले असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

शिवराळ भाषा, टीआरपीचा प्रयत्न

राज्यात रोज सकाळी ९.३० वाजता प्रसिद्धीमाध्यमांसमोर शिवराळ भाषा वापरून काहींचा आपली टीआरपी वाढविण्याचा प्रयत्न असतो, आपण या भानगडीत पडत नाही असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT