Children death case Coldriff cough syrup
नागपूर : मागील काही दिवस चर्चेत असलेल्या आणि प्रतिबंध घातलेल्या दूषित कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनामुळे उपचार घेत असलेल्या १९ लहान बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. यात मध्यप्रदेशातील 13 मुलांचा समावेश आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCDC दिल्लीची टीम नागपूरला येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी आज (दि.७) दिली.
मध्यप्रदेश मधील छिंदवाडा जिल्ह्यातील काही लहान मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरच्या विविध दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत १९ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे नागपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकर यांनी सांगितले आहे. मल्टिपल ऑरगन फेल्युअरमुळे या रुग्णांचे मृत्यू झाल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आहे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, कोल्ड्रिफ कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायएथिलिन ग्लाइकॉलचे (DEG) प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.
डायएथिलिन ग्लाइकॉल हा औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरला जाणारा विषारी द्रव असून तो मुलांच्या किडनीला हानी पोहोचवू शकतो. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हे दूषित कफ सिरप सेवन केल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर चौकशीत कोल्ड्रिफ कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायएथिलिन ग्लाइकॉल सापडले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने या सिरपची विक्री थांबवली आहे. यासोबतच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) ने सहा राज्यांमधील औषधनिर्मिती कंपन्यांची-आधारित तपासणी देखील सुरू केली आहे. नागपुरात अन्न व औषध प्रशासन विभागाने सॅम्पलिंग सुरू केल्या नंतर वैद्यकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.