टी-९ वाघाचा मृत्यू 
गोंदिया

गोंदिया : वर्चस्वाच्या लढाईत टी-९ वाघाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन वाघाच्या झालेल्या झुंजीत टी-९ या नर वाघाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि २२) सकाळी १० च्या सुमारास मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात उघडकीस आली.

वाघांच्या अधिवासासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव जंगलांमधील पोषक वातावरण असल्यामुळे गेल्या १० वर्षांत गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्याचे शुभ संकेत मिळत असताना जिल्ह्याच्या चौफेर वाघांचा अधिवास आहे. विशेष म्हणजे, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जंगल हा मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. ज्यामध्ये नागझिरा ते पेंच, नागझिरा नवेगाव- ताडोबा, नागझिरा-उमरेड, पवनी, कऱ्हांडला अभयारण्य असा एक कॅरिडोर आहे. त्यामुळे वनपरिसरात हमखास वन्यप्राण्यांचा संचार दिसून येत असतानाच वाघाचाही हा भ्रमणमार्ग आहे. मागील २०२२ च्या गणनेनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जवळपास २२ वाघ असल्याचे अंदाज असून यात ३ नर व ७ मादा वाघिणीसह अडीच ते तीन वर्षीय २ वाघ व छाव्यांचा समावेश आहे. त्यातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वाघिणींना नवेगाव-नागझिऱ्यात सोडण्यात आल्याने वाघाच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान, आपल्या अस्तित्वासाठी या वाघांची झुंज सुरू झाल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

आज (रविवारी) वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य अंतर्गत मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बिटरक्षक आपल्या चमुसह नियमित गस्तीवर असताना सकाळीच्या सुमारास अंदाजे ९ ते १० वर्षे वयाचा एक नर वाघ मृत अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर., नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक राहुल गवई, सहाय्यक वनसंरक्षक, (अति.कार्य.) एम.एस.चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एम. भोसले यांनी घटनास्थळी येत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी केली. पुढील तपास नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. भोसले करत आहेत.

पंचासमक्ष वाघाची उत्तरीय तपासणी

पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे चमुद्वारे मानद वन्यजीव रक्षक तथा प्रतिनिधी मुख्य वन्यजीव रक्षक सावन बहेकार, NTCA प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, NGO प्रतिनिधी छत्रपाल चौधरी, डॉ शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वल बावनथडे यांच्या उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व वाघाचे व्हिसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणीसाठी संकलित करण्यात आले. मृत वाघ हा टी-९ असून आपसी झुंजीमध्ये गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबुत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT