गोंदिया : येत्या पाच वर्षापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कृषी पंपाचे विज बिल भरायचे नसून उपसा सिंचन योजनेला सुध्दा त्याकरीता आम्ही आधीच निधी दिला आहे. त्यातच धानाचा बोनस यावर्षीही आम्ही देणार आहे. यंदा धानाला सुद्धा २५ हजार रुपयाचा बोनस देण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडून मंजूर करवून घेत असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.१३) गोंदिया येथे केली. गोंदिया येथे आमदार विनोद अग्रवाल यांच्या कर्तव्यपूर्ति मेळाव्यात ते बोलत होते.
आपल्या सरकारने सिंचनाला महत्वा दिले असून शेतकर्यांचा विकास हाच आमच्या पक्षाचा मुलमंत्र असल्याचे सांगत भाजपच्या काळातच विदर्भातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले, असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. तर काँग्रेसच्या काळात विदर्भातील सिंचनाच्या प्रकल्पाला निधीच मिळत नव्हता, त्यामुळे सिंचनाचे प्रश्न आम्हाला सोडवण्याची संंधी मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.परिणय फुके, आमदार विजय रहागंडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले, माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले, माजी आमदार संजय पुराम, केशव मानकर, भेरसिंग नागपुरे, हेमंत पटले, भाजप जिल्हाध्यक्ष येशूलाल उपराडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यंत्री फडणवीस म्हणाले की, १ कोटी लखपती दिदी करायचा आमचा निर्धार असून पंतप्रधानांनी दिलेला मंत्र आपल्याला जपायचा आहे. आपल्या लाडक्या बहिण योजनेविरुध्द काँग्रेसचे लोक न्यायालयात गेले की, ही योजना फसवी आहे. नाना पटोले, उध्दव ठाकरे व शरद पवार ही योजना आपली सरकार आल्यावर बंद करु, असे म्हणत आहेत. परंतु ज्यांच्यासोबत लाडक्या बहिणी आहेत, त्यांचेच सरकार पुन्हा येणार असल्याने विरोधकांचे स्वप्न हे असेच राहणार असल्याची टिका त्यांनी केली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरीता आणणारे आमदार विनोद अग्रवाल असून महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदारांमध्ये यांचा समावेश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. प्रास्तविकात आमदार विनोद अग्रवाल यांनी गेल्या पाच वर्षात म्हणजे विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामाची माहिती सांगितली तसेच आपण विशेष मागणी करून डांगोर्ली व पिंडकेपर प्रकल्पाकरिता विशेष निधी आणल्याची माहिती दिली.
आमदार परिणय फुके यांनी गोंदिया मतदारसंघात विनोद अग्रवाल यांनी विकासाची गंगा आणली असून राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल केल्याचेही म्हणाले. २०१४ ते १९ पर्यंत राज्यात एकाही शेतकर्याची वीज कापली गेली नाही, असे सांगत आता विज बिल माफ केल्याचे फुके म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन पंचायत समितीचे सभापती भुनेश्वर रहांगडाले यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांनी मानले. कार्यक्रमाला लाडक्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती होती.
धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामात हेक्टरी २० हजार रुपये बोनस महायुती सरकारनं दिलं होतं. मात्र, आता ते २५ हजार रुपये करून देणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात धानाला बोनस घोषित होत होत असले तरी, ते शेतकऱ्यांना मिळत नव्हते, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. आमचे सरकार आले तेंव्हा पासुन आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना आधी १५ हजार बोनस दिला, नंतर २० हजार रुपये व यावर्षी २५ हजार रुपये बोनस ची मागणी आहे. ती मागणी मी वकील बनवून मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मागणी पूर्ण करून देईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
फडणवीस यांचे आगमन होणार असल्याने जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली असताना महिलांची मोठी गर्दी होती. तर विशेष म्हणजे, परतीच्या पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे कार्यक्रमासाठी जमलेल्या नागरिकांची तारांबळ झाली.