चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा
वाघांच्या हल्यात नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना काही थांबता थांबेनात. आज सकाळी गावालगतच्या जंगलात मोहफुले वेचायला गेलेला वृध्द वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे. मारोती सखाराम बोरकर (वय 60) असे मृताचे नाव असून तो गंगासागर हेटी येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात आठवडाभरात चौघंचा मृत्यू झाल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील मारोती सखाराम बोरकर हा वृध्द अन्य काही व्यक्तींसोबत नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात सकाळी सहाच्या सुमारास मोहफुले वेचायला गेला. दररोज तो साडेआठ वाजेपर्यंत मोहफुले वेचून घरी परत यायचा. परंतु आज तो घरी परत आला नाही. त्यामुळे घरचे व शेजाऱ्यांनी गावालगतच्या जंगलात शोधाशोध केली असता, लगतच्या पांदनरस्त्यावर त्याची चप्पल व टोपली पडलेली आढळून आली.
मोहफुले वेचून त्याच्या सोबती जंगलाबाहेर निघाले परंतु सदर इसम निघाला नाही. त्यामुळे शंका निर्माण झाली. काही वेळातच त्याच परिसरात सहकाऱ्यांना वाघ आढळून आला. त्यामुळे सदर व्यक्तीचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा संशय निर्माण झाला. काही अंतरावर जावून पाहिले असता त्याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती तळोधी (बा.) वन परिक्षेत्राधिकारी व पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनाकरीता नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.
मृत व्यक्तीच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन व 2 नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने गंगासागर हेटी परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. वनविभागाने नागरिकांना जंगलात मोहफुले वेचण्याकरीता एकदम सकाळीच व एकट्याने जावू नये आवाहन केले आहे. गंगासागर हेटी परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून, गस्त वाढविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील आठवडाभरात नागभीड तालुक्याला लागून असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव व चिचखेडा येथील मोहफुले वेचायला गेलेल्या दोघांना वाघाने ठार केले. सिंदेवाही येथे एक तर आज नागभीड तालुक्यातील तळोधी बा.परिसरात पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. मुल, सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातील व्यक्तींचे वाघ जीव घेत असल्याने वनविभागाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.