पिक विमा बैठकीत बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Pudhari Photo
चंद्रपूर

पिक विमा योजनेची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा!

पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर : चंद्रपूरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिक विमा योजनेची शुक्रवारी (दि.20) आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळाला नसल्याने पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिकविम्याची रक्कम देण्यासाठी कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. शेतकरी हा कदापी दुःखात असू नये, अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरी सहकार्य केले पाहिजे, शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही. यासाठी प्रशासकीय स्तरावरून संवेदनशीलपणे प्रयत्न व्हावे, कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा कडक शब्दात सुचना केल्या.

पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पिकविमा मिळावा याकरीता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचेकडून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. चंद्रपूर जिल्ह्याचे काम ओरिएंटल पिक विमा कंपनीकडे असून सदर कंपनीने २०२.६७ कोटी रुपये पिक विमा योजनेची रक्कम मान्य केली आणि १४३.८१ कोटी रुपये वितरित करण्यात आले. परंतु अद्यापही ५८.९४ कोटी रक्कम थकीत आहेत. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, कृषी अधीक्षक शंकर तोटावार, शेतकरी नेते बंडू गौरकर आणि विमा कंपनीचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. विमा कंपनीने राज्य सरकारकडे मागणी करून देखील अद्याप ही रक्कम प्राप्त न झाल्याने पालकमंत्री मुनगंटीवार यांनी कृषी विभागातील कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

चंद्रपूर जिल्ह्यात १ लक्ष ५१,३५२ शेतकऱ्यांनी पीक विमा दावा दाखल केला होता, यापैकी १ लक्ष १८,५८८ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम प्राप्त झाली, ३२ हजार ७६४ शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम अप्राप्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रक्कम अप्राप्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिले. विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश ना. मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून कृषी मंत्र्यांनी मागील बैठकीत दिले होते.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून चर्चा !

पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अतिशय संवेदनशील पणे दखल घेणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांना दूरध्वनी करून वस्तुस्थिती अवगत करून दिली. पिक विमा योजने संदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची आपण पूर्ती करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ यासाठी आपल्या स्तरावरून आदेश द्या अशी विनंती देखील ना मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT