चंद्रपूर : गेल्या १२ वर्षांपासून जमिनीचा मोबदला आणि नोकरीसाठी चाललेला आदिवासी कोलाम समाजाचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील माणिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनीने चुनखडी उत्खननासाठी घेतलेल्या जमिनींवर आदिवासींचा हक्क नाकारल्यामुळे संतप्त आदिवासींचा आज गुरूवारी (दि.29) संयम सुटला.
हापरमध्ये उत्खनन बंद करून खदान परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले असून चुनखडीची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सध्या कुसुंबी परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
सन २०१२ पासून आदिवासी समाजाने शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे आपली व्यथा मांडली. अठरा आदिवासी कुटुंबांची जमीन बळकावून मोबदला न देता आणि पुनर्वसन न करता कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली. शासनाच्या पातळीवर वारंवार बैठकाही घेण्यात आल्या, मात्र कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.
माणिकगड सिमेंट कंपनीला ६४३.६२ हेक्टर जमिनीचा लीज करार १९८४ मध्ये मंजूर झाला. त्यातील काही भाग वनविभागाकडे सोपवण्यात आला असला, तरी उर्वरित ४९३ हेक्टरवर कंपनीने संमतीशिवाय उत्खनन सुरू केले.याशिवाय, नोकारी व बॉम्बेझरी शिवारातील ३० हेक्टर जमीन कंपनीने बनावट मंजुरीद्वारे खरेदी केल्याचा आरोप आहे. ही प्रक्रिया करताना जमीन "सिलिंग अंतर्गत" दाखवण्यात आली आणि नगररचना विभागाची मंजुरी नसताना बांधकाम परवानगी मिळवण्यात आली.
रस्ते बंद करणे, पिण्याचे पाण्याचे स्रोत नष्ट करणे, नियमबाह्य उत्खनन, शमशानभूमीवर अतिक्रमण अशा अनेक तक्रारी आदिवासींनी प्रशासनाकडे दिल्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट पोलिस प्रशासनाचा वापर करून आदिवासींवर दबाव टाकण्यात येत आहे, असे आरोप आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहेत. सध्या कुसुंबी परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही.
विविध आंदोलन करणाऱ्या आदिवासींवर ८ ते ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, शेतकरी, आदिवासींना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत असून, स्वतःच्या जमिनीसाठी लढणाऱ्यांची अवस्था चोरासारखी झाली आहे. आज गुरूवारी २९ मे रोजी संतप्त आदिवासींनी हापर खदानमध्ये थेट जाऊन चुनखडीची वाहतूक बंद केली. "आमच्या जमिनी परत द्या, मोबदला द्या, नोकरी द्या नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका" अशी ठाम भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
प्रमुख आंदोलक भिमा मडावी, रामदास मंगाम, अरुण उद्दे, चिन्नु मुक्का, आत्राम, यशोदा सिडाम, लक्ष्मी पेंदोर, ताराबाई कुडमेथे, लक्ष्मी मेश्राम, जंगु पेंदोर आदी प्रकल्पबाधित आदिवासी आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदेालकांनी संपूर्ण जमिनीचे नव्याने भूमापन व सीमांकन करावे, जमिनीचा योग्य मोबदला व पुनर्वसन द्यावे, प्रत्येक प्रकल्प बाधित कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अन्यायकारक गुन्हे मागे घ्यावेत आणि कंपनीवर चौकशी सुरू करावी आदी मागण्या केल्या आहेत.