विदर्भ

अमरावती : गत पाच वर्षात कुपोषणात घट; मेळघाटात ‘मिशन @२८’ फलदायी

backup backup

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : मेळघाटात 'मिशन २८'सारख्या सातत्यपूर्ण विशेष मोहिमा आणि सूक्ष्म नियोजनामुळे गत पाच वर्षात कुपोषित बालकांच्या संख्येत घट झाली आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. यापुढेही मोहिमांमधील सातत्य व ग्राम बाल विकास केंद्रांद्वारे तपासणी, आहार व उपचार हे प्रयत्न कुपोषण निर्मूलनासाठी प्रभावी ठरतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केला.

मेळघाटात गत पाच वर्षांपासून कुपोषणात घट होत आहे. २०२० मध्ये ४५६ अतितीव्र कुपोषित बालके होती. ही आकडेवारी २०२२ मध्ये २१३ पर्यंत व मे २०२३ पर्यंत २०५ इतकी घटली. बालमृत्यूची संख्या २०१९ मध्ये २४६, २०२० मध्ये २१३, २०२१ मध्ये १९५, २०२२ मध्ये १७५ व मे २०२३ मध्ये १९ याप्रमाणे घटत गेली आहे. मातामृत्यूतही मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, अशी माहिती जि. प. महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके यांनी दिली.
मेळघाटात मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या मार्गदर्शनात जानेवारी २०२२ पासून मिशन@२८ राबविण्यात येत आहे. त्यात बालकांचा जन्म होण्यापूर्वी २८ दिवस आणि बालकांचा जन्म झाल्यानंतर २८ दिवस या कालावधीत बालकांच्या घरी भेट देऊन तपासणी केली जाते. या कालावधीत बालमृत्यूचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही मोहिम हाती घेण्यात आली. प्रकृतीबाबत जोखीम असलेल्या मातांच्या घरी अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर रोज भेटी देतात. गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांचे समुपदेशन केले जाते. त्याच्या रोज नोंदी घेऊन आवश्यकतेनुसार उपचार होतात. पूर्वी घरी प्रसूती होण्याचे प्रमाण १७ टक्के होतं ते आता केवळ सहा टक्क्यांवर आले आहे.
कमी वजनाची आणि मध्यम कुपोषित बालके तीव्र कुपोषणामध्ये जाऊ नयेत यासाठी पेसा फंड वापरून कमी वजनाच्या सुमारे चार हजार बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांत दाखल करण्यात आले आहे. असा उपक्रम राबविणारा अमरावती हा एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात कुपोषित बालकांची संख्या कमी होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
महिला बाल विकास विभागामार्फत बालकांना सकस पूरक आहार, मातांना अमृत आहार, मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र, तीव्र कुपोषित बालकांना जास्तीचा आहार, बालकांना अंडी वाटप, त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी, दरवर्षी एप्रिल आणि जून महिन्यात झोन सर्वेद्वारे माता आणि बालकांची सूक्ष्म तपासणी, बालरोग तज्ज्ञांच्या सेवा, प्रत्येक उपकेंद्रात नर्स, बाल आरोग्य अधिकारी, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्भरण केंद्रे, बालकांचे आणि मातेचे वेळेत लसीकरण आदी उपाय सातत्याने राबविण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT