धार्मिक विधी करताना दुर्घटना; दोन आठवडे सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली File Photo
ठाणे

Thane Crime : धार्मिक विधी करताना दुर्घटना; दोन आठवडे सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली

डोंबिवलीत होम कुंडाच्या भडक्यात भाविक महिलेचा होरपळून मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : नवरात्रौत्सवाच्या अष्टमीला होम कुंडात तुपाची आहुती देत असताना ओढणीने पेट घेतल्याने डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या टिळकनगर परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय भाविक महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही महिला पूजेसाठी बसली असताना ओढणीने पेट घेतल्याने गंभीररित्या भाजली होती. ओढणी पेटल्यानंतर या महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्याने ती गंभीररित्या होरपळली होती. एका खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत असतानाच मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूने टिळकनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सरिता निरंजन ढाका (वय ३३) असे मृत महिलेचे नाव असून ती पती निरंजन इंदरलाल ढाका (३६) यांच्यासह टिळकनगरमधील शिव पॅराडाईज इमारतीत राहत होती. या मृत्यूप्रकरणी सरिता यांच्या पतीने दिलेल्या माहितीवरून टिळकनगर पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद केली आहे.

पोलिस मिळालेली अधिक माहिती अशी, निरंजन आणि सरिता ढाका राहत असलेल्या परिसरात नवरात्रौत्सव सुरू होता. सात दिवसांसाठी बसविलेले घट आणि देवीची पूजा केल्यानंतर नवरात्रौत्सवातील आठव्या दिवशी अष्टमीला देवीला होम हवन केले जाते. साग्रसंगीत नैवद्य दाखविला जातो. या होम/हवन पूजेसाठी सरिता ढाका बसल्या होत्या. यज्ञकुंड धगधगण्यासाठी होमामध्ये समिधा, शेण गोवऱ्यांसह त्यावर तूप टाकले जात होते.

होमाच्या बाजूला पुजेसाठी बसल्यावर सरिता ढाका यांनी देवीचा मान राखण्यासाठी गळ्यातील ओढणी डोक्यावर घेतली होती. डोक्यावर ओढणी घेऊन त्या होमामध्ये समिधा, हवनासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू टाकत होत्या. होमातील शेण गोवऱ्या तूप टाकल्यामुळे धगधगत होत्या. सरिता यांनी उठून होम कुंडामध्ये चमच्याने तूपाची धार टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेटलेल्या शेण गोवऱ्या तूपाच्या धारेमुळे धगधगून पेटल्या आणि त्याच्या ज्वाळा वरच्या दिशेने येऊन सरिता यांच्या डोक्यावरील ओढणीला लागल्याने ओढणीने पेट घेतला. ही आग पसरत गेल्याने त्यांच्या कंपड्यांनीही पेट घेतला. या घटनेत त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. उपस्थित नागरिकांनी आग विझवत त्यांना तात्काळ डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील एम्स रूग्णालयात दाखल केले. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच दोन आठवड्यानंतर सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. व्ही. विसपुते अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT