ठाणे : ठाणे जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये पार पडला. यामध्ये 53 पैकी 27 जागांवर महिला आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी 2, अनुसूचित जमाती 7 आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 7 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 11 जागांवर महिला आरक्षण असणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर टप्प्याटप्य्याने येऊ घातल्या असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण मागील महिना भरापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले असून, सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 सदस्य (गट) साठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये 53 जागांपैकी 27 जागांवर महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात, अनुसूचित जातीच्या तीन जागांपैकी 2 जागांवर महिला, अनुसूचित जमातीच्या 13 जागांपैकी 7 जागांवर महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 14 जागांपैकी 7 जागांवर महिला आणि सर्वसाधारण 23 जागांपैकी 11 जागांवर महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षणाचा बिगुल वाजताच आता राजकीय पक्षांकडून सत्ता संतुलनाचा खेळ सुरू झाला आहे. आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बहुतांश नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यांनतर या नेतेमंडळीतून कहीं खुशी कहीं गमचा सूर उमटत आहे.
दरम्यान, पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षणही मागील महिन्यात जाहीर झाले असून, यामध्ये शहापूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी, मुरबाडचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, कल्याण पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी, भिवंडीचे सभापती पद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आणि अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.