भिवंडी (ठाणे) : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अपघात होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाययोजना करण्यासाठी वारंवार मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर आयुक्त तथा प्रशासकांचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक जाहिद मुख्तार शेख यांनी अखेर 1 मे रोजी जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडी शहरातील नादुरुस्त रस्ते तसेच उड्डाणपुलावर धोकादायक स्थितीतील केबल आदी मुद्द्यांबात दोन वेळा उपोषण केले. परंतु पालिका अधिकार्यांनी आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई केली नाही. तसेच प्रशासन शहरातील तरुणांचे जिव वाचविण्यास असमर्थ ठरल्याने, समाजसेवक व जबाबदार नागरिक या नात्याने येत्या 1 मे रोजी भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका मुख्यालया समोर जीवनयात्रा संपविण्याचा इशारा दिल्याबाबतची माहिती समाजसेवक जाहिद मुख्तार शेख यांनी प्रत्यक्ष दिली. तसेच याबाबतचे लेखी पत्र शेख यांनी पालिका प्रशासनास देखील दिले आहे.
भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका हद्दीतील राजीव गांधी व इतर सर्व उड्डाण पुलावर असलेले केबल कनेक्शन व नेट कनेक्शन काढण्यात यावे. उड्डाणपुलावर हे केबल लटकत असल्याने त्यापासून नागरिकांना शॉक लागून नागरिकांचे जिवीतास हानी होण्याची दाट शक्यता आहे. काही महिन्यापूर्वी राजीव गांधी उड्डाण पुलावर केबल कनेक्शन मध्ये दोन मुले वाहनाने जात असतांना अडकल्याने त्यांचा भीषण अपघात होउन जागीच मृत्यु झाला होता. परंतु पोलीसांनी फक्त एकतर्फी कार्यवाही करुन फक्त मयत मुलांवर गुन्हा दाखल केले, अनधिकृत केबल कनेक्शन जोडलेल्या व्यक्तिंवर गुन्हा दाखल करण्यात आले नाही.तसेच पुलावरील मर्करी लाईट स्ट्रिट लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळी नेहमी अंधार असतो. त्याचप्रमाणे शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर देखील पथदिवे बंद असावल्याने देखील अपघात होत आहेत. त्यामुळे देखील उड्डाण पुलावर अपघात होत असल्याने ते पथ दिवे तातडीने सुरु करण्यात यावे. तसेच भिवंडी शहरात काही ठिकाणी ठेकेदार आर.सी.सी. रोडचे काम अर्धवट टाकून निघून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. अशा ठिकाणी देखील अपघात होत आहेत. तसेच वंजारपट्टी नाका ते लिबर्टी हॉटेल,कल्याणाक परिसर आणि कल्याण रोड या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजुला आरसीसी रोड बनविण्यात आले आहे. मात्र या रस्त्यालगत लावलेल्या पेव्हर ब्लॉकची सामान पातळी ढासळून ते वाकडे-तिकडे झाले आहेत. त्यामध्ये देखील खड्डे झाले आहेत. विविध ठिकाणी जीवघेणे खड्डे झाले असून खड्ड्यामधील अंतर व रस्त्यातील अंतर खुप जास्त असल्याने सदर ठिकाणी सतत अपघात होत आहे. नागरीकांना गंभीर इजा व दुखापात होत आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
या अपघातामधून नागरीकांचे हात पाय तुटणे इत्यादी गंभीर घटना सतत घडून नागरिकांना अपंगत्व येत आहे. तर काही वेळा या मार्गावर अपघात होऊन प्राणहानी देखील झालेली आहे. याबाबत शहरातील समाज सेवक जाहिद मुख्तार शेख यांनी पालिकेला लेखी पत्र देऊन दोन वेळा दिवसभराचे महापालिकेसमोर उपोषण केले. या उपोषणास माजी खासदार सुरेश टावरे यांनी देखील पाठिंबा देत काहीवेळ थांबून या उपोषणाचे समर्थन केले. मात्र पालिका प्रशासनाने सार्वजनिक हिताच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून जाहिद मुख्तार शेख यांनी 1 मे महाराष्ट्रदिन या दिवशी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असून या बाबतचे लेखी पत्र भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनामोल सागर यांच्यासह संबंधित अधिकार्यांना देण्यात आले आहे. या घटनेची शहरातील नागरिकांनी दखल घेतली असून शहरातून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.