ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आणि विशेष करून ठाणे आणि मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार का, याबाबत अद्याप कोणत्याच प्रकारचा निर्णय झालेला नाही. मात्र ठाणे विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आम्ही फार पूर्वीपासूनच निवडणुकीच्या कामाला लागलो असून आमचे सैन्य देखील तयार आहे. त्यामुळे ही निवडणूक स्वतंत्र लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असून ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल, असे वक्तव्य केळकर यांनी केले आहे. केळकर यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यात भाजप शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे एकत्र येण्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
ठाण्यातील विविध प्रश्नाच्या संदर्भात उबाठा, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एकत्र मोर्चा काढला. महापालिकांची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी, शिवसेना भाजप युतीमध्ये निवडणूक लढणार का, याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अद्याप कोणत्याच प्रकारची घोषणा केलेली नाही. मात्र त्यापूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी युतीबाबत मोठे विधान केले आहे.
प्रत्येक स्थानिक स्वराचे संस्थांच्या निवडणुकीची गणिते ही वेगळी आहेत. ठाण्यात मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही वेगळी असल्याचे केळकर यांनी सांगितले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरू असून पालिका निवडणुकीसाठी आमचे सैन्य तयार असल्याचे केळकर यांनी सांगितले. यावेळी महापौर देखील भाजपचाच बसेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युतीबाबत मोठा प्रश्न...
ठाणे महापालिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून या ठिकाणी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय काही मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. अशावेळी आमदार संजय केळकर यांनी केलेले वक्तव्य देखील महत्वाचे मानले जात असून ठाण्यात युतीबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.