नेवाळी : महामार्गांवरील वाहतूककोंडीमुळे मंगळवारी कामगारवर्गाला प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील खोणी फाटा परिसरात सकाळपासून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तर खोणी-तळोजा महामार्गावरील खोणी फाटा ते उसाटने गावापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या डोंबिवली, तळोजा, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कामगारवर्गाला वाहतूककोंडीचा सामना करावा लागला आहे. तीन ते चार तास वाहतूककोंडीत अडकलेल्या कामगारांनी कामावर जाण्यापेक्षा पुन्हा घरचा रस्ता धरल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.
वाहतूककोंडीच्या समस्येने चाकरमानी प्रचंड त्रस्त झाले आहेत. डोंबिवली अंबरनाथ महामार्गावरील खोणी म्हाडा कॉलनी परीसरात प्रचंड खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्डयांमध्ये वाहने आदळून नादुरुस्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सातत्याने या परिसरात सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तर खोणी-तळोजा महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
सकाळीच अवजड वाहनांची वाहतूक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यामुळे दोन जिल्ह्यात होणारी वाहतूक खोळंबलेली दिसून येते. मात्र या वाहतूक कोंडीवर वाहतूक विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या उपायोजना केल्याचे दिसून येत नाही. सकाळच्या सुमारास कामावर जाणारे चाकरमानी, शालेय विद्यार्थी यांसह रुग्णवाहिका चालकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे दिवस रात्र सुरु असलेल्या वाहतूक कोंडीवर पर्याय कधी काढला जाणार? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.