ठाणे : वारंवार तक्रार करूनही ठाणे महापालिका क्षेत्रातील आणि विशेषत: दिव्यातील सर्व अनधिकृत शाळा सर्रासपणे सुरू असून या सर्व अनधिकृत शाळांचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करा, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. काही शाळांचा पाणीपुरवठा खंडित करूनही केवळ वीजपुरवठा असल्याने या शाळा सुरू आहेत. त्यामुळे या अनधिकृत शाळांना सुविधा देणार्या सरकारी यंत्रणांच्या संगनमतामुळे या शाळा सुरू असल्याचा आरोपही केळकर यांनी केला आहे.
खाडीच्या पलिकडे मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांप्रमाणे अनधिकृत शाळांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट आहे. या शाळांची संख्या कमी होण्याच्या ऐवजी वाढली असून सध्या दिवा परिसरात 81 अनधिकृत शाळा असून या सर्व शाळा सुरू असल्याचा दावा अधिकृत शाळा संघटनेकडून केला जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षण अधिकार्यांनी अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्यात यावे, अशा सूचनाकेल्या होत्या. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष केले असून या शाळा राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे.
अनधिकृत शाळांबाबत आ. संजय केळकर यांची अधिकृत शाळांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी भेटही घेतली होती. तर आ. केळकर यांनी कठोर भूमिका घेत अनधिकृत शाळांचा वीज, पाणीपुरवठा खंडित केल्यास या शाळा सुरू राहणार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र या शाळांना सुविधा मिळत असल्याने या शाळा यंत्रणांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप आ. केळकर यांनी केला आहे.
अनधिकृत शाळांच्या विरोधात शिक्षण विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र गुन्हे दाखल होऊनही अनधिकृत शाळा चालवणार्यांना एकाला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे देखील लक्ष वेधले असून गुन्हे दाखल झालेल्या शाळांच्या संदर्भात पुढे काय कारवाई झाली, याचा पोलीस आयुक्त आढावा घेणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.