भिवंडी : शहरातील शांतीनगर परिसरातील सराईत गुन्हेगार असलेल्या सफरअली मोहंमद युसुफ (युनूस) शेख उर्फ गफु, (वय-42) रा. गैबीनगर याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करीत त्याला एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सफरअली शेख उर्फ गफु हा शांतीनगर पोलीस ठाणे अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर व सराईत गुन्हेगार आहे. तो त्याच्या साथीदारांसह भिवंडी शहर व परिसरात दहशत पसरवत होता. त्याविरोधात 2002 साली गंभीर स्वरूपाचा पहिला गुन्हा नोंदवला गेला होता. त्यानंतर त्याच्यावर भिवंडी शहरातील शांतीनगर, भोईवाडा, भिवंडी शहर, निजामपुरा, तसेच मिरारोड या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याचा जमाव करून मारामारी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने जबर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, लोक सेवकास मारहाण करणे, गोवंशची चोरी करून त्याची कत्तल करून गोमांस जवळ बाळगून मांस विक्री करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपी विरुद्ध शांतीनगर पोलीस स्टेशन तसेच निजामपुरा पोलीस स्टेशन येथे नव्याने गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल झाल्याने त्याच्यावर शांतीनगर पोलिसांनी एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली होती. त्यानंतरही आदेशाचे पालन न करता भिवंडी शहरात छुप्या पद्धतीने येऊ न आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याने शांतीनगर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्याने आपल्या गुन्हेगारी वर्तनात बदल न केल्याने त्याच्या विरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का अंतर्गत कारवाई करत त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.