विधानसभा महासंग्राम : ठाण्यात मुख्यमंत्र्यांसह मातब्बर नेते मैदानात file photo
ठाणे

विधानसभा महासंग्राम : ठाण्यात मुख्यमंत्र्यांसह मातब्बर नेते मैदानात

पुढारी वृत्तसेवा
राजन शेलार

Maharashtra Assembly elections 2024 | ठाणे जिल्हा हा गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेली फूट आणि महाराष्ट्रात 40 तर त्यातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तब्बल दहा आमदार शिंदेंसोबत गेल्याने या पक्षात उभी फूट पडली. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठाणे राहिल्याने या जिल्ह्याच्या राजकारणावर या बंडाचे मोठे परिणाम झाले. साहजिकच येणारी विधानसभा ही या बंडाच्या राजकारणाभोवती फिरत राहणार आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण 18 आमदार आहेत. यामधील भाजपकडे सर्वाधिक म्हणजे नऊ आमदार आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेकडे पाच आमदार आहेत; तर राष्ट्रवादी शरद पवार गट एक, राष्ट्रवादी अजित पवार गट एक, समाजवादी पार्टी एक आणि अपक्ष एक असे संख्याबळ आहे. मात्र, उमेदवारीवरून ठाणे जिल्ह्यात महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघही ठाणे जिल्ह्यात आहे. कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून ते पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढतही प्रतिष्ठेची होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या ज्या आणखी लढती आहेत, त्यामध्ये डोंबिवलीत भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ताकदवान उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी खासदारकीच्या रिंगणात उतरलेल्या वैशाली दरेकर यांचे नाव चर्चेत आहेत. दुसरा प्रतिष्ठेचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त असल्याने महायुतीकडून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मुस्लिम चेहरा रिंगणात आणून आव्हाडांना शह देण्याची रणनीती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार यांना कळवा मुंब्रा मतदारसंघात 68 हजारांचे मताधिक्य होते. हे मताधिक्य तोडण्यासाठी मुस्लिम चेहरा महायुती रिंगणात उतरवणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेचा आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे ऐरोली. या विधानसभा मतदार संघात माजी मंत्री गणेश नाईक हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यांनतर 2014 आणि 2019 या दोन्ही काळात मंत्रिपद न मिळाल्याने ते महायुतीमध्ये नाराज झाले. खरे तर ऐरोली हा गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा हा मतदारसंघ; तर गणेश नाईक यांच्या बेलापूर मतदारसंघात भाजपच्याच मंदा म्हात्रे आमदार आहेत. नाईक आणि म्हात्रे कुटुंबीयांचे विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या लढतीला यावेळी अधिक धार येणार आहे. येथे पक्षांतरालाही ऊत येण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात 18 विधानसभेपैकी मुरबाड या मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे आमदार आहेत. मात्र, त्यांनी लोकसभेला कपिल पाटील यांचे काम केले नाही, असा थेट आरोप होत असल्याने ते अस्वस्थ आहेत. लोकसभेला पराभूत झालेले कपिल पाटील आता मुरबाड मतदारसंघात विधानसभेला उमेदवारी मागणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघातही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. किसन कथोरे हे भाजपमधून उभे राहणार की महाविकास आघाडीची वाट धरणार, याबाबत आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहेत. आणखी एक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे तो कल्याण ग्रामीण. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील विद्यमान आमदार आहेत. मनसेने ‘एकला चलो रे’चा निर्णय विधानसभेसाठी घेतला आहे. त्यामुळे महायुतीला येथे उमेदवार शोधावा लागणार आहे. विधान परिषदेची मुदत संपल्याने आमदारकीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवी फाटक यांना या मतदारसंघाचा रस्ता दाखवला जाऊ शकतो; तर ठाकरे गटाकडून येथे माजी आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.

भिवंडीमध्ये एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये सध्या एक जागा समाजवादी पार्टीकडे, दुसरी जागा भाजपकडे तर कल्याण ग्रामीणची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. लोकसभेला या तिन्ही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. याच जोरावर शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे विजयी झाले होते. त्यामुळे महायुतीला आव्हानात्मक स्थिती आहे. कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार महेश चौगुले हे पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. भिवंडी ग्रामीणमधून शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे हेच पुन्हा रिंगणात राहणार आहेत; तर महाविकास आघाडीकडून नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. कल्याणमध्येही तीन विधानसभा मतदारसंघ असून कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे या जागेवर उमेदवार कोण, असा प्रश्न आहे. दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाने येथे उमेदवार देण्याची तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे येथे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळेल.

ठाणे जिल्ह्यातील उर्वरित मतदारसंघामध्ये शहापूर, ठाणे शहर आणि ओवळा-माजिवडा अशा तीन मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी शहापूरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी दिली जाणार आहे; तर लोकसभेला या मतदासंघात मताधिक्य मिळालेल्या जिजाऊ संघटनेकडूनही उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत अपेक्षित आहे. ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे संजय केळकर विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेनेही दावा केला आहे. त्यामुळे येथे उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. एकूण लोकसभा निवडणुकीतून मतांचा कल पहिला, तर महाविकास आघाडीसाठी भिवंडी लोकसभा पूरक ठरू शकते; तर महायुतीसाठी ठाणे आणि कल्याण लोकसभा हे मतदारसंघ महायुतीला पूरक ठरू शकतात, असे एकूण चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT