डोंबिवली : मराठी आणि परप्रांतीय वाद सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत मंगळवारी दुपारी भर रस्त्यात उफाळून आला. वर्षानुवर्षे फुटपाथ आणि रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्या महिलांनी दिवाळीचे स्टॉल लावण्यास विरोध करत मराठी तरुणींना थेट आव्हान तर दिलेच, शिवाय तुम्ही मराठी माणसे चोर...पाकीटमार...आमच्या पायाखालचे...अशा शब्दांत हिणवणी केली. शिवाय सहानुभूती मिळविण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचे नाटकही सादर केले.
या साऱ्या प्रकारांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पश्चिम डोंबिवलीतील घनश्याम गुप्ते रोडवर हरिओम मोबाईल दुकानासमोर स्त्रीवल्ली फाऊंडेशनने दिवाळी सणाच्या निमित्त तात्पुरत्या स्वरूपात फराळ, पणत्या, रांगोळ्या, कंदील, फटाके, कपडे, आदी दिवाळी साहित्याचे स्टॉल लावण्याची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून परवानगी दिली आहे. १३ ते १९ ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून फाऊंडेशनच्या वतीने स्टॉलसाठी मंडप टाकण्याकरिता महिला सदस्या जागा पहात होत्या. यावेळी त्यांना दुकानदारांनी दुकानासमोर एकदम स्टॉल लावू नका, असे सांगितले. शिवाय तेथील फुल-फळ विक्रेत्या परप्रांतीय महिलांनी देखिल रस्त्याच्या कोपऱ्यावर मंडप टाकण्यास विरोध केला.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे व्यवसाय करत आहोत. त्यामुळे येथे तुम्ही स्टॉल लावायचा नाही, असा हेका परप्रांतीय महिलांच्या टोळक्याने धरला. शिवाय तुम्ही मराठी माणसं पाकीट चोर आहात, आमच्या पायाखालचे आहात, अशा शब्दांत परप्रांतीय महिलांच्या टोळक्याने हिणावल्याचा आरोप फाऊंडेशनच्या रेखा रेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. स्टॉलसाठी केडीएक्सी आम्ही रीतसर परवानगी घेतली आहे. त्यासाठी आवश्यक परवाना फी देखिल भरली आहे. तरीही स्टॉलसाठी जागा देण्यास परप्रांतीय महिलांच्या टोळक्याने विरोध केला आहे.
आम्ही मराठी माणसाने व्यवसाय करायचा नाही का ? परप्रांतीयांना या परिसरातील फुटपाथ आणि रस्ते बळकावण्याची मुभा कुणी दिली ? हेच परप्रांतीय केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हप्ता देतात. आम्ही तर स्टॉल लावण्यासाठी परवाना फी भरून परवानगी घेतली आहे. त्यामुळे आम्ही कुणाकडे दाद मागायची ? असाही सवाल स्त्रीवल्ली फाऊंडेशनच्या रेखा रेडकर यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना उपस्थित केला.