ठाणे : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरता आता भरून निघणार आहे. पालघर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी विकल्प निवडलेले तब्बल 247 शिक्षक ठाणे जिल्ह्यात परत येणार आहेत. यामध्ये 207 शिक्षकांनी शाळा सुरू होण्याच्या आधीच हजेरी लावली आहे.
जिल्हा विभाजनानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांना पालघर जिल्ह्यात सेवा द्यावी लागली. आता तेथील शिक्षकांचे संख्याबळ पुरेसे असल्यामुळे विकल्प दिलेले 247 शिक्षक ठाणे जिल्ह्यात परत येत आहेत. त्यामुळे जिल्हातील शिक्षकांची कमतरता भरून निघणार आहे. या शिक्षकांपैकी 207 शिक्षक सुटीच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात हजर झाले आहेत:
शालेय सुटीच्या कालावधीतच हे शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांची तात्पुरती नियुक्ती तालुका पातळीवरून करण्यात आली आहे. उर्वरित शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले असून, लवकरच बदल्याही ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
जिल्ह्यात 127 मुख्याध्यापक पदांपैकी 73 पदे रिक्त आहेत. सध्या फक्त 54 मुख्याध्यापक पदे कार्यरत असून, यामुळे अनेक शाळांमध्ये शैक्षणिक तसेच प्रशासकीय व्यवस्थापनावर ताण आहे.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 572 पदे अद्याप रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण 1,328 प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 3,000 पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या दोन किंवा त्याहूनही कमी असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील 214 शाळा ’एक शिक्षकी’ स्वरूपात आहेत, यातील बहुसंख्य शाळा दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये आहेत. यामुळे शिक्षकांच्या अनुपस्थितीचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसतो.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ’दिशा’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी या नव्याने नियुक्त शिक्षकांमुळे शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेतील यश लक्षणीयरीत्या वाढले आहे.