नागेश्वर-कनकेश्वर यात्रेवर परतीच्या पावसाचे सावट pudhari photo
ठाणे

Nageshwar Kankeshwar Yatra : नागेश्वर-कनकेश्वर यात्रेवर परतीच्या पावसाचे सावट

व्यावसायिक चिंतेत; मोठ्या आकाशपाळण्यांना ब्रेक; बच्चेकंपनी टेन्शनमध्ये

पुढारी वृत्तसेवा

सोगाव : अब्दुल सोगावकर

परतीच्या पावसाचा फटका नागेश्वर व कनकेश्वर येथील यात्रेला बसला आहे. यात्रेत येणाऱ्या व्यावसायिक, लहान मोठे खेळणी व इतर तत्सम वस्तू विक्रेते, मिठाईचे दुकानदार, आकाश पाळणे, ब्रेकडान्स व इतर सर्व मनोरंजनांचे व्यवसायिक चिंतेत सापडले आहेत.

कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेसोबत रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील साजगावची यात्रा सुरू होते. यानंतर अलिबाग तालुक्यातील आवास येथील नागेश्वरची भरते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. यात्रेला रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या यात्रेची शेतकरी वर्ग मोठ्या आशेने वाट पाहत असतात. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवला असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावर्षी आवास येथील नागेश्वरची यात्रा मंगळवार, 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे तर मापगाव येथील कनकेश्वर ची यात्रा 5 व 6 नोव्हेंबर असे दोन दिवस होणार आहे. आवास - नागेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे बैलगाडी आहे, या यात्रेत शेतकरी आपल्या बैलगाडीतून परंपरेने दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. यामुळे यात्रेला विशेष महत्त्व आहे. तर मापगाव येथील श्री क्षेत्र कनकेश्वर येथे त्रिपुरारी पौर्णिमेला प्राचीन काळापासून भरणाऱ्या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षांपासून कनकेश्वरची यात्रा हि दोन दिवस भरत आहे.

या यात्रांची चतुरचातकप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह भाविकांमध्ये तसेच लहानमुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अरबी समुद्रात नुकत्याच आलेल्या चक्रीवादळामुळे परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवला आहे. एकंदरीतच या यात्रांवर परतीच्या पावसाचे सावट असल्याने शेतकरी, भाविक व बच्चेकंपनी सुद्धा यात्रा भरते की नाही याच चिंतेत आहेत.

यात्रा महोत्सवात कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी आवास ग्रामपंचायत व मापगाव ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायत प्रशासनाने चोख व्यवस्था केली असून कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी पावसाचे सावट असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या मनोरंजनांची पाळणे यांना मनाई करण्यात आली आहे, तसेच भाविकांना पाऊस व इतर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रेतील काही व्यावसायिक दुकानदारांना आवास येथील क्रिकेट मैदानाकडे हलविण्यात आले आहे. यात्रेत सर्व अत्यावश्यक सेवा, पिण्याचे पाणी, शौचालय, अग्निशमन दल आदी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यादरम्यान पाऊस आल्यास भाविकांची धर्मशाळा व इतर ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
अभिलाषा राणे, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत आवास
यात्रेत व्यावसायिक दुकानदार व भाविकांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. यात्रेदरम्यान पाऊस आल्यास भाविकांची थांबण्याची व्यवस्था समाज मंदिर व धर्मशाळेत करण्यात आली आहे. तसेच पावसात दुकानदार व व्यावसायिकांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करण्यासाठी करावी असे सांगितले आहे. भाविकांना पिण्याचे पाणी, शौचालय इतर व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच भाविकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास कनकेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष, सदस्य व ग्रामपंचायत प्रशासनाकडे संपर्क साधावा.
सुनील थळे, अध्यक्ष, कनकेश्वर यात्रा कमिटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT