कुपोषित बालके file photo
ठाणे

Child health crisis | मिरा-भाईंदरमध्ये 139 बालके कुपोषित

9 अतिकुपोषित, अहवाल सादर करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदर या झपाट्याने विकसित होणार्‍या शहरात एकूण 139 बालके कुपोषित असून त्यातील 9 बालके अतिकुपोषित असल्याची धक्कादायक बाब आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या पालिकेतील भेटीदरम्यान समोर आली आहे. या बालकांवरील उपचारासाठी त्याच्या आहारावरील नियंत्रणासाठी त्रिदस्यीय पथक काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिरा-भाईंदर शहर मोठयाप्रमाणात विकसित होत असून त्यात नवनवीन शासकीय व पालिकेची विकासकामे करण्यात आली आहेत व सुरू आहेत. स्वच्छता सर्वेक्षणात तर शहराचा पहिल्या 10 मध्ये क्रमांक लागतो. अशा विकसित शहराच्या दिशेने वाटचाल करणार्‍या शहरात कुपोषित बालके असल्याची धक्कादायक बाब शहराच्या नाकर्तेपणाचा कारभार असल्याचे द्योतक मानले जात असल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली.

मंगळवारी ते पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी पार पडलेल्या बैठकीत त्यांनी मिरा-भाईंदर शहराततील कुपोषाणाची माहिती घेतली. यात या शहरात एकूण 139 बालके कुपोषित असून त्यापैकी 9 बालके अतिकुपोषित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या कुपोषित बालकांवरील उपचारासाठी पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष सुरू असून त्यात या बालकांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या कुपोषित बालकांना सामान्य करण्यासाठी पालिकेसह शासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. याप्रश्नी अनेकदा शासकीय यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येते. या उदासीनतेमुळे एकही कुपोषित बालक दुर्दैवाने दगावल्यास ही स्थानिक प्रशासन म्हणून पालिकेसाठी शरमेची बाब ठरणार आहे.

बैठकीत पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, शासनाच्या प्रकल्प अधिकार्‍यांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

त्रिसदस्यीय पथकाची नियुक्ती

ही कुपोषित तसेच अतिकुपोषित बालके सामान्य होण्यासाठी त्यांच्या उपचारासह आहारावर नियंत्रण ठेवण्याकरीता पालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, पालिकेचा तसेच शासनाचा महिला व बाल विकास विभाग या त्रिसदस्यीय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे तात्काळ कुपोषित बालकांवरील उपचाराचा आढावा घेऊन त्याचा अहवाल आपल्यासह शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT