ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणार्या मेट्रो स्थानकांच्या नावावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मेट्रो स्थानकांना एमएमआरडीएच्या वतीने सुचवण्यात आलेल्या नावांत काही गृहप्रकल्पांची नावे असून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.
एखाद्या बिल्डरने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावे एमएमआरडीएच्या वतीने काही स्थानकांना सुचवण्यात आली असून ही नावे बदलून गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी तसेच आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार होणे गरजेचे आहे अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मेट्रो-4, मेट्रो-9 व मेट्रो-10 चे काम सुरु असून या स्थानकांना एमएमआरडीएच्या वतीने नावे सुचवण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचविलेली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावे देखील देण्यात आलेली आहेत असा आक्षेप सरनाईक यांनी घेतला.
मेट्रो-4 च्या स्थानकांची नावे : गायमुख भाइर्दरपाडा, मोघरपाडा ओवळा, वाघबीळ, कासारवडवली, मानपाडा, तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी, माजीवडा, कॅडबरी जंक्शन ऐवजी ठाणे महानगरपालिका भवन, छत्रपती संभाजी नगर स्थानक, आरटीओ, तीन हात नाका ऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक असे करण्यात यावे.
मेट्रो-9 च्या स्थानकांची नावे : दहिसर, पांडुरंग वाडी, मीरा गाव, काशिगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर ऐवजी प.पू. नानासाहेब धर्माधिकारी स्थानक, शहीद भगतसिंग नगर उद्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक
मेट्रो-10 च्या स्थानकांची नावे : भाइर्दर पाडा, गायमुख, रेतीबंदर ऐवजी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी, चेना व्हिलेज ऐवजी चेना गाव, वर्सोवा, काशिमिरा, दहिसर