मिरा रोड ः काशीमीरा परिसरातील डाचकुल पाडा परीसरात दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने त्याचा मनात राग धरुन मंगळवारी सकाळी दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत बाहेरून मुले बोलावून मारहाण केल्याने परीसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयीत व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
काशीमीरा परिसरातील डाचकुल पाडा परीसरात मोठया प्रमाणात अनधिकृत झोपड्या बनवल्या जात आहेत. या परीसरात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनधिकृत रूम बनवुन त्या रुम भाडयाने दिल्या जातात. या रुम मध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक येवून राहतात. या भाडेकरूंची कोणतीही माहिती स्थानिक प्रशासनाकडे नसते. तसेच या भागात गांजा, अमली पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळे मुळ स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या भागात गांजा विकणाऱ्या काही व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील या भागात अमली पदार्थ हे विकले जात आहेत.
या परीसरात परप्रांतीय रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या देखील मोठया प्रमाणात आहे. अनेक रिक्षा चालक यांच्या कडे लायसन्स, बॅच असे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. याबाबत काही रिक्षावाल्यां विरोधात काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तक्रार केल्याचा राग मनात धरून मंगळवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास जवळपास 50 पेक्षा जास्त जमावाने डाचकुल पाड्यांमध्ये राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांवर कोयता व काठ्या घेऊन हल्ला केला.
यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. त्यावेळी रस्त्यामध्ये मोठया प्रमाणात रिक्षा उभ्या केलेल्या असल्यामुळे त्या रस्त्याने अँब्युलन्स देखील आत येऊ शकत नव्हती. त्याचा स्थानिक रहिवाशांना राग आल्याने त्यांनी रस्त्यावर पार्किंग केलेल्या 50 पेक्षा जास्त रिक्षांच्या काचा फोडल्या आहेत. त्यामुळे परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त राहूल चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त यांनी परिसराला भेट दिली. या घटनेला हिंदू मुस्लिम असा रंग येवू लागल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट घेवून मारहाण झालेल्या कुटुंबाची भेट घेतली व पोलीसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.